मुंबई: यंदा शिवराज्याभिषेक दिन मोठ्या थाटामाटात साजरा होणार असल्याचं चित्र आहे. गेल्या दोन वर्षांमध्ये कोरोनाच्या प्रादुर्भावामुळे शिवराज्याभिषेक दिनाच्या सोहळ्याला शिवभक्तांना हजेरी लावता आली नव्हती. यंदा मात्र रायगड पुन्हा दुमदुमणार असल्याचं चित्र आहे. 


संभाजीराजे छत्रपतींनी यंदाचा शिवराज्याभिषेक दिनासंबंधी एक ट्वीट केलं आहे. तसेच गेल्या काही दिवसांपासून या शिवराज्याभिषेक दिनाची तयारी सुरू असल्याची माहिती आहे. अखिल भारतीय शिवराज्याभिषेक सोहळा समितीकडून त्या संबंधीचे नियोजन करण्यात येत आहे. तसेच कोल्हापुरातून सह्याद्री प्रतिष्ठान आणि वेगवेगळ्या संघटनांनींही 6 जूनच्या कार्यक्रमाची सर्व तयारी केली असल्याची माहिती आहे. 


 






शिवराज्याभिषेक सोहळा हा केवळ महाराष्ट्रातीलच नव्हे तर जगभरातील अवघ्या मराठी माणसासाठी एक आनंदाचा उत्सवच आहे. संभाजीराजे छत्रपती यांच्या मार्गदर्शनाखाली लाखो शिवभक्त हा उत्सव साजरा करण्यासाठी दरवर्षी रायगडवर येतात. पण गेल्या दोन वर्षांमध्ये कोरोनामुळे हे शक्य झालं नाही. त्यामुळे यंदाच्या शिवराज्याभिषेक सोहळ्यासाठी अपेक्षेपेक्षा जास्त शिवभक्त येण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.


यंदाच्या शिवराज्याभिषेकाला राज्यसभा निवडणुकीची किनार? 
यंदाच्या शिवराज्याभिषेक सोहळ्याला राज्यसभेच्या निवडणुकीची किनार असल्याचं स्पष्ट आहे. संभाजीराजेंना शिवसेनेने तिकीट नाकारल्यानंतर शिवप्रेमींमध्ये संताप व्यक्त केला जात आहे. त्यामुळे संभाजीराजे यावेळी रायगडावरुन काय बोलणार याकडे सर्वांचं लक्ष असेल. 


गेल्या वर्षीचा सोहळा हा काही मोजक्याच लोकांच्या उपस्थितीत साजरा करण्यात आला होता. सुमारे 350 वर्षांनी शिवराज्याभिषेक दिनानिमित्त 'सुवर्ण होनांनी' अभिषेक करण्यात आला होता. त्यावेळी संभाजीराजे छत्रपतींनी हा आपल्यासाठी आणि राज्यासाठी एक सुवर्ण क्षण असल्याचे म्हटलं होतं. शिवरायांचे हे होन देशातील जास्तीत जास्त नागरिकांपर्यंत पोहोचवण्याचं आवाहन त्यांनी शिवभक्तांना केलं होतं. 


महत्त्वाच्या बातम्या :