रायगड : मंत्रोच्चाराच्या गजरात किल्ले रायगडावर शिवराज्याभिषेक दिनाचा सोहळा संपन्न झाला. राज्याचे पर्यावरण मंत्री रामदास कदम यांच्यासह हजारो शिवभक्त किल्ले रायगडावर हजर होते.

खासदार संभाजी राजे छत्रपती यांच्या उपस्थितीत काल तारखेनुसार शिवराज्याभिषेक साजरा करण्यात आला. आज ‘श्री शिवराज्याभिषेक दिनोत्सव सेवा समिती’मार्फत तिथीनुसार 344 वा शिवराज्याभिषेक सोहळा साजरा करण्यात आला.

ढोलताशांच्या गजरात छत्रपती शिवाजी महाराज यांची पालखी राजदरबारात आणण्यात आली. त्यानंतर मंत्रोच्चराच्या गजरात अभिषेक आणि पूजन करण्यात आलं.

दरम्यान, आजच्या या कार्यक्रमासाठी पर्यावरण मंत्री रामदास कदम यांनी देखील हजेरी लावली होती. तर आजच्या या सोहळ्यावेळी ‘श्री शिवराज्याभिषेक दिनोत्सव सेवा समिती’मार्फत सरदार घराण्यातील 14 व्या वंशजांचा सत्कार करण्यात आला. यावेळेस त्यांना मानपत्र, सन्मानचिन्ह आणि मानाची तलवार देऊन सन्मानित करण्यात आले.