Shivraj Patil Chakurkar passes away : माजी केंद्रीय गृहमंत्री शिवराज पाटील चाकूरकर (Shivraj Patil Passes Away) यांचं ken (12 डिसेंबर) वयाच्या 90 व्या वर्षी निधन झालं. लातूर येथील त्यांच्या निवासस्थानी त्यांनी अखेरचा श्वास घेतला. मागील काही दिवसापासून ते आजारी होते. त्यांच्यावर आज लिंगायत समाजाच्या प्रथेनुसार शासकीय इतमामात अंत्यसंस्कार करण्यात आले. शासकीय मान वंदना देत त्यांना अखेरचा निरोप देण्यात आला. यावेळी त्यांच्या अंतिम दर्शनसाठी हजारोंचा जनसागर आला होता. आज लातूर शहरात देखील बंद पाळण्यात आला होता.
अंत्ययात्रेच्या मार्गावर रस्त्याच्या दुतर्फा नागरिकांची मोठी गर्दी
माजी केंद्रीय गृहमंत्री व ज्येष्ठ काँग्रेस नेते शिवराज पाटील चाकूरकर यांच्या अंत्ययात्रेला आज सकाळी देवघर येथील त्यांच्या निवासस्थानापासून सुरुवात झाली. वरवंटी गावच्या शिवारात असलेल्या त्यांच्या चाकूरकर फार्म हाऊसपर्यंत ही अंत्ययात्रा नेण्यात आली. अंत्ययात्रेच्या अग्रभागी त्यांचे चिरंजीव शैलेश पाटील चाकूरकर उपस्थित होते. डॉक्टर अर्चना पाटील चाकूरकर रुद्रली पाटील चाकूरकर आणि ऋषिका पाटील चाकूरकर हे ही शैलेश पाटील चाकूरकर यांच्याबरोबर चालत होते. या अंत्ययात्रेत राजकीय, सामाजिक तसेच विविध क्षेत्रांतील अनेक मान्यवर सहभागी झाले होते. लातूर जिल्ह्यासह राज्यभरातून हजारो नागरिक अंतिम दर्शनासाठी आले होते. अंत्ययात्रेच्या मार्गावर रस्त्याच्या दुतर्फा नागरिकांनी मोठी गर्दी करत आपल्या नेत्याला अश्रूंच्या साक्षीने निरोप दिला.
निष्कलंक, पुरोगामी विचारांचे आणि अजातशत्रू नेतृत्व अशी त्यांची ओळख
शिवराज पाटील चाकूरकर यांनी लातूरचे नगराध्यक्ष म्हणून आपल्या राजकीय कारकीर्दीची सुरुवात केली. त्यानंतर दोन वेळा आमदार, सात वेळा खासदार म्हणून त्यांनी लोकांचे प्रतिनिधित्व केले. लोकसभेचे सभापती, केंद्रीय गृहमंत्री तसेच राज्यपाल अशी अनेक महत्त्वाची पदे त्यांनी भूषवली. संपूर्ण राजकीय आयुष्यात ते काँग्रेस पक्षाशी एकनिष्ठ राहिले. निष्कलंक, पुरोगामी विचारांचे आणि अजातशत्रू नेतृत्व अशी त्यांची ओळख होती. आज लिंगायत समाजाच्या प्रथेनुसार त्यांच्यावर शासकीय इतमामात अंत्यसंस्कार करण्यात आले. मन वंदना देत शासकीय सन्मानाने त्यांना अखेरचा निरोप देण्यात आला.
लातूर शहर बंद
शोककळा अंत्ययात्रेनिमित्त लातूर शहरातील सर्व बाजारपेठा पूर्णतः बंद होत्या. व्यापारी संघटनांनी स्वयंस्फूर्तीने व्यवहार बंद ठेवत श्रद्धांजली अर्पण केली. संपूर्ण शहरात शोककळा पसरली होती.
मान्यवरांची उपस्थिती
लोकसभाध्यक्ष ओम बिर्ला, केंद्रीय राज्यमंत्री संजय सेठ, खासदार अशोक चव्हाण, लातूरचे खासदार डॉक्टर शिवाजी काळगे, माजी खासदार चंद्रकांत खैरे, आमदार संजय बनसोडे, आमदार अभिमन्यू पवार, माजी आमदार शिवाजीराव पाटील कव्हेकर, माजी आमदार दिलीपराव देशमुख, डॉ. भागवत कराड, मल्लिकार्जुन खरगे, ईश्वर खंडरे, आमदार संभाजी पाटील निलंगेकर, माजी खासदार गोपाळराव पाटील, माजी आमदार पाशा पटेल यांच्यासह भाजप, काँग्रेस व इतर पक्षांचे अनेक पदाधिकारी उपस्थित होते.
ओम बिर्ला यांनी वाहिली श्रद्धांजली
आज सर्वजण दुःखात आहेत. शिवराज पाटील चाकूरकर यांनी सहा दशकांहून अधिक काळ सामाजिक व सार्वजनिक जीवन जगत देशाची निःस्वार्थ सेवा केली आहे. लोकसभेची गरिमा वाढवण्याचे महत्त्वपूर्ण कार्य त्यांनी केले आहे. संसदेला नवे रुप देत संसदीय समित्या अधिक सक्षम केल्या आहेत. तसेच अनेक नवे नियम अमलात आणले आहेत. त्यामुळं संसदेचे महत्त्व अधिक वृद्धिंगत झाले. त्यांचे अमूल्य योगदान कायम स्मरणात राहील,” अशा शब्दांत लोकसभाध्यक्ष ओम बिर्ला यांनी त्यांना श्रद्धांजली वाहिली.
मल्लिकार्जुन खरगे यांनी वाहिली श्रद्धांजली
मी त्यांच्यासोबत दीर्घकाळ काम केले. आमची पहिली भेट 1967 साली झाली, तेव्हा ते आमदार होते. 1971 मध्ये मी कर्नाटकातून निवडून आलो आणि त्यानंतर आमच्या भेटीगाठी अधिक वाढल्या. आज त्यांना श्रद्धांजली वाहणे यासारखे दुःख दुसरे काय असू शकते. त्यांच्या घरात गेल्यावर जेवल्याशिवाय कुणालाही जाऊ देत नसत, असा त्यांचा आपुलकीचा स्वभाव होता. ते सोनिया गांधी, राहुल गांधी तसेच इंदिरा गांधी यांच्या अत्यंत जवळचे होते. पराभव पत्करूनही त्यांच्या कार्यक्षमतेमुळे त्यांना मंत्रिपद देण्यात आले. त्यांच्या कुटुंबाला या मोठ्या दुःखातून सावरण्याची शक्ती मिळो,” अशा शब्दांत काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे यांनी भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण केली.
संजय सेठ यांची श्रद्धांजली
शिवराज पाटील चाकूरकर हे अत्यंत विनम्र नेतृत्वाचे प्रतीक होते. त्यांच्या निधनाने सर्वांनाच मोठा धक्का बसला आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनीही या दुःखद शोक व्यक्त केला आहे. अशा समर्पित, मूल्यनिष्ठ आणि संयमी नेतृत्वामुळेच देश घडत असतो, अशा शब्दांत केंद्रीय राज्यमंत्री संजय सेठ यांनी भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण केली.
अशोक चव्हाण यांची श्रद्धांजली
शिवराज पाटील चाकूरकर यांच्याशी माझे कौटुंबिक संबंध होते. लहानपणापासून त्यांना पाहत आलो आहे. त्यांच्या व्यक्तिमत्त्वाला ठाम धार्मिक अधिष्ठान होते. सर्वांशी जिव्हाळ्याचे संबंध ठेवणारी, माणुसकी जपणारी त्यांची वृत्ती होती. त्यांची कार्यप्रणाली इतरांपेक्षा वेगळी आणि अभ्यासपूर्ण होती. ‘दिल्लीला आलात तर मला भेटा,’ असा आमच्यातील शेवटचा संवाद होता,” अशा शब्दांत माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांनी भावनिक श्रद्धांजली अर्पण केली.
दिलीपराव देशमुख यांची श्रद्धांजली
शिवराज पाटील चाकूरकर यांनी आपल्या पदाचा उपयोग नेहमी सर्वसामान्य जनतेसाठी केला. अजातशत्रू, चिंतनशील, निष्कलंक आणि अत्यंत अभ्यासू व्यक्तिमत्त्व अशी त्यांची ओळख होती. त्यांच्या जाण्याने मोठी पोकळी निर्माण झाली असून ही उणीव कायम जाणवत राहील. ते नेहमी तब्येतीची काळजी घ्यायला सांगत असत. कॉलेजमध्ये प्रवेश घेतल्यापासून मला त्यांचा सहवास लाभला,” अशा शब्दांत माजी मंत्री दिलीपराव देशमुख यांनी भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण केली. शिवराज पाटील चाकूरकर यांच्या जाण्याने राजकीय, सामाजिक आणि सार्वजनिक जीवनात मोठी पोकळी निर्माण झाली असून त्यांचे योगदान कायम स्मरणात राहील, अशी भावना सर्वत्र व्यक्त होत आहे.
महत्वाच्या बातम्या: