Suhas kande: मालेगाव (Malegaon) तालुक्यातील डोंगराळे गावात तीन वर्षीय चिमुरडीवर अत्याचार करून तिची निर्घृण हत्या केल्याची घटना घडली होती. 16 नोव्हेंबर रोजी गावातील 24 वर्षीय विजय संजय खैरनार याने या चिमुरडीवर प्रथम अत्याचार केला आणि नंतर तिचे डोके दगडाने ठेचून अमानुषपणे हत्या केली होती. या प्रकरणावरून राज्यभरात निषेध व्यक्त करण्यात आला. या अत्याचाराप्रकरणी नांदगाव विधानसभा मतदारसंघाचे आमदार सुहास कांदे (Suhas Kande) यांनी विधानसभेत (Vidhan Sabha) लक्षवेधी मांडली. मात्र लक्षवेधीला उत्तर देण्यासाठी गृहराज्यमंत्री (ग्रामीण) पंकज भोयर (Pankaj Bhoyar) विधानसभेत उपस्थित नसल्याचे सुहास कांदे चांगलेच आक्रमक झाल्याचे पाहायला मिळाले.
इथे मंत्री महोदय कोण आहे? असा सवाल सुहास कांदे यांनी लक्षवेधी मांडतांना उपस्थित केला. यावेळी गृहराज्यमंत्री योगेश कदम म्हणाले की, ग्रामीणचे गृहराज्यमंत्री हे वरच्या सभागृहात प्रश्नोत्तराच्या तासाकरता गेले आहेत. ते याबाबत उत्तर देणार आहेत. तर सुधीर मुनगंटीवार म्हणाले की, हा अत्याचाराचा गंभीर विषय आहे. बावनकुळे साहेब याबाबत माहिती देतील. ते आमचे संवेदनशील नेते आहेत. ही काय नवीन पद्धत विकसित केली आहे, असा म्हणत त्यांनी संताप व्यक्त केला. यानंतर चंद्रशेखर बावनकुळे म्हणाले की, ही लक्षवेधी उद्यासाठी राखून ठेवू. ही लक्षवेधी आपण उद्या घेऊ. यावर सुहास कांदे म्हणाले की, मला गृहमंत्र्यांचे उत्तर पाहिजे आहे. खात्याचे उत्तर मला हवे आहे. अध्यक्ष महाराज आम्ही काय सातवी नापास नाही. ग्रामीणच्या गृहमंत्र्यांकडून मला उत्तर हवे आहे. भुजबळला पाडून इथं आलोय, असे म्हणत सुहास कांदे चांगलेच आक्रमक झाले. तर, मी मुलीचा बाप आहे. इथे प्रत्येक जण मुलीचा बाप आहे. आम्हाला मालेगाव प्रकरणी उत्तर हवे, असे सुहास कांदेंनी ठणकावून सांगितले. यावर तालिका अध्यक्ष समीर कुणावार यांनी आजच लक्षवेधी घेणार. मंत्री आले की घेऊ, असे म्हटले.
Suhas kande: या राज्यात कायद्याची भीती राहिली नाही का?
यानंतर काही वेळाने ग्रहराज्यमंत्री (ग्रामीण) पंकज भोयर विधानसभेत दाखल झाले. यावेळी लक्षवेधी मांडताना सुहास कांदे म्हणाले की, 16 नोव्हेंबर 2025 रोजी मालेगावच्या डोंगराळे गावात तीन वर्षाच्या चिमुरडीवर शेखर उर्फ विजय खैरनार या नराधमाने अत्याचार करून तिचा खून केला. खून केल्यानंतर तिला झाडा-झुडपात फेकून दिलं. ती बेपत्ता आहे म्हणून पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल झाला. त्यानंतर हा नराधम पोलिसांसोबत त्या मुलीला शोधायला फिरत होता. त्या तीन वर्षाच्या मुलीचा सापडल्यानंतर पोलिसांनी ताबडतोब त्याच दिवशी त्या नराधमाला अटक केली. अटक केल्यानंतर मी आणि माझी पत्नी चिमूरडीच्या कुटुंबाला भेटायला गेलो. तेव्हा आम्हाला कळले की, त्या चिमुरडीची आई फक्त 23 वर्षांची आहे. तिने आत्तापर्यंत तीन वेळा आत्महत्येचा प्रयत्न केला. अत्यंत प्रतिकूल परिस्थितीत ते लोक जगत आहेत. इथे बसलेल्या प्रत्येकाला बहीण किंवा मुलगी असेल. तीन वर्षाच्या मुलीवर बलात्कार करायचा तिचा खून करायचा झाडा-झुडपात फेकून द्यायचे आणि ताठ मानेने त्या गावात पोलिसांसोबत फिरायचे. या राज्यात कायद्याची भीती राहिली नाही का? असा संतप्त सवाल त्यांनी उपस्थित केला.
Suhas kande: तीन वर्षाच्या मुलीला न्याय मिळू शकेल का?
सुहास कांदे पुढे म्हणाले की, हे कायद्यात बसत नाही. परंतु त्या नराधमाला जनतेच्या ताब्यात द्या. त्या मुडदा काढला पाहिजे. या प्रकरणात ज्या सरकारी चांगल्या वकिलाला वेळ असेल, तो वकील द्यावा. ही केस फास्ट ट्रॅकमध्ये चालवणार आहात का? या प्रकरणात जो न्यायाधीश असेल ती महिला न्यायाधीश असेल का? तीन वर्षाच्या मुलीला न्याय मिळू शकेल का? नराधमाला फाशीची शिक्षा होईल का? या केसचा निकाल एक महिन्याच्या आत लागेल का? असे सवाल उपस्थित करत त्यांनी संताप व्यक्त केला.
Pankaj Bhoyar: काय म्हणाले पंकज भोयर?
यानंतर गृहराज्यमंत्री ग्रामीण पंकज भोयर म्हणाले की, सुहास कांदे यांनी मालेगावमधील प्रकरणाची विस्तृत माहिती दिली. पोलीस प्रशासनाने देखील तातडीने विषयाची दखल घेतली. आरोपीला न्यायालयीन कोठडी मिळालेली आहे. या प्रकरणात उज्ज्वल निकम यांची विशेष सरकारी उपभोक्ता म्हणून नियुक्ती करण्यात आलेली आहे. हा खटला जलद गतीने न्यायालयात वर्ग करण्याबाबत उच्च न्यायालयात 3 डिसेंबर रोजी विनंती करण्यात आलेली आहे. आपण न्यायालयाला विनंती करू शकतो की, लवकरात लवकर दोषींवर कारवाई व्हावी, असे त्यांनी सांगितले.
आणखी वाचा