नवी दिल्ली : आपल्या शौर्याने अवघ्या जगाला भुरळ घालणाऱ्या आणि शत्रूला कापरं भरायला लावणाऱ्या छत्रपती शिवाजी महाराजांच्या जयंतीचा जंगी कार्यक्रम आज राजधानी दिल्लीत होत आहे. त्यासाठी देशभरातून हजारो शिवप्रेमी नवी दिल्लीत दाखल झाले आहेत.

महाराष्ट्र सदनातून शिवजन्मोत्सव सोहळा आणि शाहिरी कार्यक्रमाने शिवजयंती कार्यक्रमाची सुरुवात होईल. शिवजयंतीचं औचित्य साधून राजपथावरुन भव्य मिरवणूक निघेल. ज्यात हत्ती, घोडे आणि उंटही पाहायला मिळतील.



शिवजयंती हा राष्ट्रीय उत्सव बनावा ही त्यामागची मुख्य संकल्पना आहे. या कार्यक्रमाला खुद्द राष्ट्रपती रामनाथ कोविंद आणि लष्करप्रमुख बिपीन रावत यांची हजेरी असणार आहे.

कशी असेल कार्यक्रमाची रुपरेखा?

महाराष्ट्रात शिवजयंतीचा उत्सव जोरात साजरा होतोच, पण राजधानी दिल्लीत प्रथमच हा सोहळा भव्यदिव्य प्रमाणावर साजरा होणार आहे. शोभायात्रेत पुण्याच्या 300 कलाकारांचं स्वराज्य ढोलपथक, 200 जणांची वारकरी दिंडी, 20 जणांचं शाहिरी पथक, 80 कलाकारांचे मर्दानी खेळ पथक, धनगरी ढोल पथक असा सगळा थाट असणार आहे.

सकाळी दहा वाजता दिल्लीतल्या महाराष्ट्र सदनात शिवजन्मोत्सव सोहळा साजरा होणार आहे. त्यानंतर सकाळी 11 ते दुपारी 1 या वेळेत महाराष्ट्र सदनापासून राजपथ मार्गे इंदिरा गांधी राष्ट्रीय कला केंद्रापर्यंत शोभायात्रा निघणार आहे.

संध्याकाळी 6 वाजता शिवमूर्तीला अभिवादनाचा जो मुख्य कार्यक्रम होणार आहे, त्यासाठी राष्ट्रपती रामनाथ कोविंद, लष्करप्रमुख बिपीन रावत हे हजेरी लावणार असल्याची माहिती खासदार संभाजीराजे यांनी एबीपी माझाला दिली. हा सोहळा संपल्यानंतर संध्याकाळी 7 वाजता इंदिरा गांधी राष्ट्रीय कला केंद्रातच शिवगर्जना या महानाट्याचा प्रयोग सादर होणार आहे.