कोल्हापूर : पुणे-बंगळुरु राष्ट्रीय महामार्गावर आंबेडकर नगर येथे भीषण अपघात झाला. या अपघातात 5 विद्यार्थ्यांचा जागीच मृत्यू झाला, तर 20 विद्यार्थी जखमी झाले आहेत. सर्व विद्यार्थी सांगलीतल्या वालचंद महाविद्यालयातील आहेत.

आज पहाटे साडे चार वाजता नागाव पुणे-बंगळुरू राष्ट्रीय महामार्गाजवळील आंबेडकर नगर येथे हा भीषण अपघात झाला. शिवजयंती निमित्त हे विद्यार्थी पन्हाळ्याहून सांगलीला शिवज्योत घेऊन जात होते. त्यासाठी त्यांनी ट्रक केला होता. ट्रकमध्ये सुमारे 30 विद्यार्थी होते.

सांगलीला जात असताना समोरुन आलेल्या बाईकला चुकवताना हा अपघात झाला. हा अपघात इतका भीषण होता की महामार्गावरील पुलावरच ट्रक उलटला. त्यामुळे ट्रकखाली दबल्या गेल्याने पाच विद्यार्थ्यांचा मृत्यू झाला.

अपघातातील मृतांची नावं :

  1. केतन प्रदीप खोचे (वय 21)

  2. सुमित संजय कुलकर्णी (वय 23)

  3. अरुण अंबादास बोंडे (वय 22)

  4. सुशांत विजय पाटील (वय 22)

  5. प्रवीण शांताराम त्रिलोटकर (वय 23)


अपघात झाल्याचं कळताच आजूबाजूच्या गावकऱ्यांनी आणि पोलिसांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेऊन जखमींना तातडीने सीपीआर रुग्णालयात दाखल केले. या जखमींवर उपचार सुरु असून त्यापैकी काही जणांची प्रकृती गंभीर असल्याचं सांगण्यात येतं आहे.