लातूर : शरद पवार हे स्वत: फोडाफोडी करून मुख्यमंत्री झाले होते. सत्तेसाठी ज्यांनी चारवेळा पक्षांतर केले आज त्यांच्याच कार्यकर्त्यांनी त्यांना सोडले. शरद पवारांनी जे पेरलं तेच उगवलं आहे, त्यांना पक्षांतरावर बोलायचा अधिकार नाही, अशा शब्दात माजी मुख्यमंत्री शिवाजीराव पाटील निलंगेकर यांनी शरद पवारांवर टीका केली आहे.


निलंगा येथे एबीपी माझाशी बोलताना निलंगेकर म्हणाले की, शरद पवारांमुळे काँग्रेसमध्ये फूट पडली आणि काँग्रेसचे नुकसान झाले. आता त्यांचे तसेच होत आहे.  पवार फोडाफोडी करून मुख्यमंत्री झाले. स्वतः पवारांनी एकदा-दोनदा नव्हे तर चार वेळेस पक्ष सोडला. त्यांनी नंतर काँग्रेसमध्ये फूट पाडली. दुसरी काँग्रेस स्थापन केली तसेच पुलोदचा प्रयोग केला. अशा पवारांना आता पक्षांतरावर बोलायचा काय अधिकार? असा सवाल शिवाजीराव पाटील निलंगेकर यांनी केला आहे.



वसंतदादांच्या पाठीत खंजीर खुपसणारे कोण आहेत? असाही सवाल निलंगेकरांनी शरद पवारांना केला. पवार हे राज्याच्या नव्हे तर देशाच्या राजकारणातील विलक्षण व्यक्तिमत्व आहे. पवारांनी आपल्या राजकीय वाटचालीत अनेकांना धोबीपछाड दिली. कित्येक सहकाऱ्यांचे पराभव घडवून आणले. विलासराव देशमुखांना शरद पवारांनी पराभूत केलं. पण आता पवारांचे राजकीय उपद्रव मूल्य कमी झाल्यानं भाजपच्या मेगाभरतीत राष्ट्रवादीतून सर्वाधिक भरती होत आहे, असे शिवाजीराव पाटील निलंगेकर यांनी म्हटले आहे.

आपलं मुख्यमंत्रीपद घालवण्यातही शरद पवारांचाच हात आहे, असेही शिवाजीराव पाटील निलंगेकर यांनी म्हटलं आहे. वैद्यकीय प्रवेशासाठी मुलींचे गुण वाढवल्याचा आरोप शिवाजीराव पाटील निलंगेकरांवर झाला होता. याच आरोपानंतर शिवाजीराव पाटील यांचं मुख्यमंत्रीपद गेलं होतं.

 पवारांनी अनेकांचे पक्ष फोडले : कृषी राज्यमंत्री सदाभाऊ खोत  
शरद पवारांनी आतापर्यंत अनेकांचे पक्ष फोडले. मात्र आज त्यांचा राष्ट्रवादी पक्ष त्याच्याच डोळ्यादेखत फुटत आहे. करावं तसं भरावं ही म्हण आपल्याकडे चांगली प्रचलित आहे. जे पवार साहेबांनी पेरलं तेच उगवलं आणि हे चित्र पवारांना पाहण्याचं भाग्य देखील लाभलं, अशा शब्दात कृषी राज्यमंत्री सदाभाऊ खोत यांनी शरद पवार यांच्यावर सांगलीत टीका केली आहे. शरद पवार यांनी वसंतदादा पाटील यांच्या पाठीत खंजीर खुपसला असं बोललं जातं, त्यावेळी वसंतदादा पाटील यांना किती दुःख झाले असेल. त्यामुळे आता शरद पवार यांच्या पक्षात जे घडतंय ते फार वेगळं घडतंय असं नाही असे म्हणत खोत यांनी वसंतदादा-शरद पवार यांच्या वादाची आठवण करून दिली.