मुंबई : सध्या महाविकास आघाडीमधील नेत्यांच्या वक्तव्यांमुळे सर्व काही ठीक नसल्याचे दिसून येत आहे. पवार साहेबांचा आशिर्वाद डोक्यावर आहे, म्हणून उद्धव ठाकरे मुख्यमंत्रिपदावर असल्याचं मोठं वक्तव्य खासदार अमोल कोल्हे यांनी केलं होते. खासदार अमोल कोल्हे यांच्या वक्तव्याचा शिवसेनेचे माजी खासदार शिवाजी आढळराव पाटील यांनी समाचार घेत मुख्यमंत्र्यांबद्दल केलेल्या वक्तव्याचा निषेध केला आहे. 


आढळराव पाटील म्हणाले, "तुम्ही जी सत्तेची फळं चाखताय, तुमच्या नेत्यांना जी मंत्रीपद मिळाली, ती शिवसेनेमुळंच मिळाली आहेत असं मी सुद्धा म्हणू शकतो. पण माझा मुजोरपणा नाही. कारण शरद पवार, उद्धव ठाकरे आणि सोनिया गांधी यांच्या संगनमताने हे सरकार चाललेलं आहे. तेव्हा तुम्ही जास्त आगाऊपणा करू नका. जेवढी स्क्रिप्ट दिली, तेवढंच बोला."


"खासदार अमोल कोल्हेंनी काल अकलेचे तारे तोडले. आपली उंची आणि लायकी ते विसरले. कोल्ह्याने उंटाच्या पार्श्वभागाचा मुका घ्यायचा असतो का? असा खोचक टोला देखीस  शिवसेनेचे माजी खासदार शिवाजी आढळराव यांनी लगावला. पुढे म्हणाले, पुणे जिल्ह्यात महाविकासआघाडीत बिघाडी करणारे खासदार अमोल कोल्हे, आमदार दिलीप मोहिते आणि आणखी एखादा कोणीतरी असेल. बाकी सर्व जण  आघाडीचा धर्म पाळत आहे."


आढळराव पाटील म्हणाले, :भांडणं आमच्या दोघांची आहेत. यामध्ये शरद पवार आणि उद्धव ठाकरे कुठून आले. माझं अजित पवार, सुप्रिया सुळे, दिलीप वळसे पाटील या राष्ट्रवादी नेत्यांशी चांगलं जुळतं. पण हे दोघे हवेत आहेत. ह्यांना वाटतंय राज्य सरकार ह्यांच्यामुळं चालतंय. अमोल कोल्हेंनी हे विसरू नये की त्यांना प्रकाश झोतात आणण्यात केवळ मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंचा हात आहे."


"मला म्हातारा म्हणतो आणि हा पाळण्यातला बाळ तर नाटकं करण्यात पटाईत आहे. सकाळी 7 ते सायंकाळी 7 फक्त शूटिंगमध्येच असतो. या शुटिंगमुळं निवडणुकीत दिलेला शब्द विसरला. खासदार झाल्यावर शूटिंग सोडून जनतेला वेळ देणार असं जाहीर केलं होतं. आता जनतेला सोडून शूटिंगमध्ये व्यस्त आहे", असे आढळराव पाटील म्हणाले. 


संबंधित बातम्या :


शरद पवारांचा आशिर्वाद असल्यानेच उद्धव ठाकरे आज मुख्यमंत्री : डॉ. अमोल कोल्हे