नांदेड : स्वातंत्र्याच्या सत्तरीनंतरही रस्ता नाही,रस्त्या अभावी गावकऱ्यांचे हाल, अनेक गरोदर माता व दुर्धर आजार असणाऱ्या रुग्णांचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे. मुखेड शहरापासून केवळ सात किमी अंतरावर असणाऱ्या गावाची राजकारण्यांच्या अनास्थेमुळे व प्रशासनाच्या दुर्लक्षामुळे दुर्दशा झालीय.


राज्याचे  बांधकाम मंत्री अशोक चव्हाण यांच्या नांदेड जिल्ह्यातील मुखेड तालुक्यातील सोनानाईक व मुन्ना नाईक तांडा येथे ही अवस्था आहे. मुखेड तालुक्या पासून केवळ सात किमी अंतरावर असतानाही राजकारण्यांच्या अनास्थेमुळे ग्रामस्थांची अनेक वर्षा पासून रस्त्याअभावी परवड  होत आहे. गाव मुखेड शहरापासून सात किलो मीटर अंतरावर असतांना ही गावात राहदरीसाठी साधा रस्ता नाही. त्यामुळे आजारी व्यक्ती, गरोदर माता आणि दुर्धर आजार असणाऱ्या गावातील व्यक्तींना दवाखान्यात जाण्यासाठी कावड करून न्यावे लागत आहे. तर रस्त्यामुळे वेळेवर दवाखान्यात उपचार न मिळाल्यामुळे अनेक गरोदर माता व रुग्णांना जीवास मुकावे लागले आहे.


मुखेड तालुक्यातील कोटग्याळवाडी ग्रामपंचायती अंतर्गत येणाऱ्या सोनानाईक तांडा व मुन्नानाईक तांडा येथे स्वतंत्र भारताच्या 74 वर्षानंतर ही प्रशासनाने रस्त्याची व्यवस्था केलेली नाही. त्यामुळे तांड्यात एखादी व्यक्ती आजारी पडला तर त्याला खाटेवर टाकून उचलून न्यावं लागते,पावसाळ्यात सर्व शेती पेरलेली असतात. त्यामुळे दळणवळणासाठी खूप मोठ्या प्रमाणात ग्रामस्थांना त्रास सहन करावा लागतो. कारण ह्या दोन्ही तांड्याला रस्ता नाही.त्यामुळे शेतातून चिखल तुडवत, झाडा झुडपातून रस्ता काढत मुखेडपर्यंत जावं लागतं.अनेकवेळा ग्रामस्थांकडून रस्त्यासाठी प्रशासनाला व लोकप्रतिनिधींना निवेदन देऊन झाले मात्र ह्या बाबीकडे कोणीही लक्ष घालत नाही.


 स्वतंत्र भारताच्या 74 वर्षानंतर व राज्याच्या बांधकाम मंत्र्यांच्या जिल्ह्यात ही अवस्था आहे .राज्याचे बांधकाम मंत्र्यांनी नांदेड जिल्ह्याच्या विकासासाठी  राज्याचा हजारो रुपयांचा निधी खेचून आणला आहे. दर दिवसाला जिल्ह्यात कोट्यवधी रुपयांचा विकास कामांचे उद्घाटने होत आहेत. त्यामुळे बांधकाम मंत्र्यांच्या जिल्ह्यात राहूनही जर येथील ग्रामस्थांना मूलभूत सुविधापासून वंचित ठेवले असतील तर हे लोकं नेमकं भारतातच राहतात का हा प्रश्न पडला आहे. येणाऱ्या स्वतंत्र दिनापर्यंत जर या रस्त्याचे काम सुरू नाही झाले तर स्वतंत्र दिनी ग्रामस्थांच्या वतीने मुखेड तहसील कार्यालयावर  तीव्र आंदोलन छेडण्यात येईल असे निवेदन थेट मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंना ईमेलद्वारे पाठवण्यात आले आहे. त्यामुळे सरकारने व राज्याच्या बांधकाम मंत्र्यांनी कोटग्याळवाडी गावच्या रस्त्याच्या समस्येकडे लक्ष देऊन परवड थांबवावी अशी मागणी ग्रामस्थांनी केलीय.