पुणे : सध्या महाविकास आघाडीमधील नेत्यांच्या वक्तव्यांमुळे सर्वकाही ठीक नसल्याचे दिसून येत आहे. काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले अशी वक्तव्ये करण्यात आघाडीवर आहेत. अशातच आता राष्ट्रवादी काँग्रेसचे शिरुर मतदारसंघाचे खासदार अमोल कोल्हे यांच्या एका वक्तव्याने सर्वांच्याच भुवया उंचावल्या आहेत. पवार साहेबांचा आशीर्वाद डोक्यावर आहे, म्हणून उद्धव ठाकरे मुख्यमंत्रिपदावर असल्याचं मोठं विधान खासदार अमोल कोल्हे यांनी केलं आहे. नाशिक महामार्गावरील खेड घाट व नारायणगाव बायपासच्या उद्घाटन कार्यक्रमात त्यांनी हे वक्तव्य केलं आहे. त्यामुळे याचे काय पडसाद उमटतात तो येणारा काळच ठरवेल. मात्र, या वक्तव्यामागे स्थानिक राजकारण असल्याचे बोलले जात आहे.


उद्धव ठाकरे मुख्यमंत्रीपदावर आहेत पवार साहेबांमुळे
आमच्यावर टीका करण्याचा एककलमी कार्यक्रम असेल आणि हा एककलमी कार्यक्रम माननीय मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या नावावर लपवला जात असेल तर प्रामाणिकपणे सांगतो माननीय मुख्यमंत्र्यांविषयी आदर आहे. मात्र, मुख्यमंत्री या पदावर आहेत, कारण, आदरणीय पवार साहेबांचा आशिर्वाद त्यांच्या डोक्यावर आहे. मुख्यमंत्र्याविषयी आदर नसता तर आता जे आरोप करतात त्यांनी माझी संसदेतील भाषणे बाहेर काढून पाहावीत. माननीय मुख्यमंत्र्यांची बाजू संसदेत अभिमानाने कोण मांडत हे तुम्हाला समजून जाईल आणि मग सांगा आम्हाला मुख्यमंत्र्यांबद्दल आदर आहे किंवा नाही. गेल्या दोन दिवसांपासून माजी खासदार आढळराव पाटील आणि विद्यमान खासदार डॉ. अमोल कोल्हे यांच्यात आरोप-प्रत्यारोप सुरु आहेत.


आजी-माजी खासदार आमने-सामने
खेड बाह्यवळण रस्त्याचे उद्घाटन व लोकार्पण खासदार डॉ कोल्हे आमदार दिलीप मोहिते पाटील यांच्या उपस्थितीत पार पडले. माजी खासदार शिवाजीराव आढळराव पाटील यांनी रस्ता होण्यासाठी प्रयत्न केले. मात्र, कार्यक्रम पत्रिकेत मुख्यमंत्री, माजी खासदार यांचे फोटो नसल्यामुळे शिवसेनेचे कार्यकर्ते नाराज झाले होते. यावरुनचं माजी खासदार आढळराव यांनी शिवसेनेच्या कार्यकर्त्यांसह शुक्रवारीच खेड व नारायणगाव रस्त्याचे उद्घाटन केले होते. यावरून खासदार डॉ. कोल्हे आज रस्ता उद्घाटनप्रसंगी टीका केली. 


कोल्हे म्हणाले, खेड बाह्यवळण रस्त्याचे श्रेय द्यायचे असेल तर ते नितीन गडकरींनाच द्यायला हवे. मात्र, माजी खासदार शिवाजीराव आढळराव यांचे आता वय झाल्याने असा अनाधिकृतपणे उद्घाटन करण्याचा पोरकटपणा करत आहे. बैलगाडा, विमानतळ, रेल्वे यावरून टीका करून माजी खासदार श्रेयवादासाठी धडपडत आहे. जुलै 20 मध्ये या कामाची वर्क ऑर्डर झाली आहे. त्यानंतर दोन वेळा कामावर समक्ष भेट देऊन अनेक अडचणी दूर केल्या. त्यामुळेच काम लवकर पूर्ण झाले. आढळराव 15 वर्ष खासदार असूनही त्यांना चाकणची वाहतूक कोंडी सोडवता आली नाही. बैलगाडा शर्यती, विमानतळ आणि रेल्वे या कामात फक्त राजकारण करत असल्याचे कोल्हे म्हणाले.