मुंबई : सिंधुदु्र्ग जिल्ह्यातील राजकोट किल्ल्यावर उभारण्यात आलेला छत्रपती शिवाजी महाराज यांचा पुतळा कोसळल्यानंतर राज्यभरात संतापाची लाट उसळली. कारण, शिवाजी महाराज हे महाराष्ट्राचं आराध्य दैवत असून कोट्यवधी जनतेचं श्रद्धास्थान आहे. मात्र, पंतप्रधानांच्याहस्ते अनावरण झालेला हा पुतळा अवघ्या 9 महिन्यातच कोसळल्याने पुतळा उभारणीत भ्रष्टाचार आणि हलगर्जीपणा झाल्याचा आरोप करत विरोधकांनी राज्य सरकारला लक्ष्य केलं. तसेच, नेटीझन्सनेही सोशल मीडियाच्या माध्यमातून आपल्या भावनांना वाट मोकळी केली. मात्र, या घटनेमुळे पुन्हा पुतळा, पुतळ्यांची सुरक्षा आणि पुतळा उभारण्यासाठीची नियमावली हा मुद्दा चर्चेत आला आहे. अशातच सोलापूर जिल्ह्याच्या बार्शी तालुक्यात उभारण्यात आलेल्या पुतळा पार्क ह्या अभिनव उपक्रमाचीही चर्चा या निमित्ताने होत आहे. माजी मंत्री दिलीप सोपल आणि राज्याचे तत्कालीन गृहमंत्री दिवंगत आर. आर. पाटील यांच्यात पुतळा पार्कसंदर्भात शासनाच्या धोरण अनुषंगाने झालेल्या बैठकीनंतर हे पुतळा पार्क उभारण्यात आले. गेल्या 14 वर्षांपासून या पुतळा पार्कमधून भावी पिढी एकाच ठिकाणावरुन अनेक महापुरुषांच्या विचारांची प्रेरणा घेत आहे.  


महापुरुषांचे पुतळे हे नव्या पिढीसाठी श्रद्धास्थान आणि प्रेरणास्थान असतात, त्यामुळे या पुतळ्यांच्या उभारणीनंतर कुठलाही अनुचित प्रकार घडू नये, कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ नये म्हणून विशेष खबरदारी घेतली जाते. त्यामुळे, बार्शीतील (Barshi) पुतळा पार्क ही अभिनव संकल्पना पुढे आल्यानंतर दिवंगत नेते माजी गृहमंत्री आर. आर. पाटील (R.R. Patil) यांनीही त्याचे स्वागत केले होते. शहरातील वाहतूक व्यवस्था सुरळीत करणे आणि कायदा व सुव्यवस्था राखण्याच्या हेतुने बार्शी शहरातील विविध भागात उभारण्यात आलेल्या 4 पुतळ्यांचे स्थलांतर करत ते एकाच जागी बसविण्यात आले आहेत. या स्थानाला पुतळा पार्क (Putala park) असे नाव देण्यात आले आहे. 


4 पुतळ्यांचे पोलीस बंदोबस्तात स्थलांतरण


शहरातील विविध ठिकाणी उभारण्यात आलेले 4 पुतळे एकाच रात्रीत चोख पोलिस बंदोबस्तात हलविण्यात आले होते. त्यानंतर, बार्शी सत्र न्यायालयासमोरील जागेत हे सर्वच पुतळे बसवून पुतळा पार्क या नवसंकल्पनेतून त्याचे अनावरण आर.आर. पाटील यांच्याहस्ते करण्यात आले. या पार्कमध्ये डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा अर्धपुतळा पूर्वीपासून होता. त्याच परिसरात 2007 साली साहित्यरत्न अण्णा भाऊ साठे आणि शाहीर अमर शेख यांचे पुतळे बसवण्यात आले. तिथे बाबासाहेबांच्या जीवनावर आधारित भितीशिल्पही तयार केलेले आहे. तर, राष्ट्रपिता महात्मा गांधी, लोकमान्य टिळक, पंडित जवाहरलाल नेहरु आणि नगरभूषण काकासाहेब झाडबुके यांचे पुतळे 2011 साली बसवून या पार्कला पुतळा पार्क हे नाव देण्यात आलं. महापुरुषांचे सर्वच पुतळे आजही दिमाखात या पुतळा पार्कमध्ये प्रेरणास्थान बनून उभे आहेत. या महापुरुषांच्या जयंती व पुण्यतिथी दिनी येथे येऊन बार्शीकर नागरिक पुतळ्याला अभिवादन करतात. 


संकल्पना आली पुढे, मंत्रालयात बैठक झाली


बार्शी नगरपालिकेचे राष्ट्रवादीचे तत्कालीन गटनेते नागेश अक्कलकोटे यांनी वाहतूक आणि कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न हाताळण्यासाठी पुतळा पार्कची संकल्पना तत्कालीन आमदार दिलीप सोपल यांच्यासमोर मांडली होती. सोपल यांनादेखील ही संकल्पना आवडल्यामुळे त्यांनी तत्कालीन गृहमंत्री आर.आर.पाटील यांच्याकडे याबाबत पाठपुरावा केला. अखेर 23 फेब्रुवारी 2011 रोजी मंत्रालयात पुतळा पार्क संदर्भाने बैठक पार पडली. त्यामध्ये, राज्य सरकारने पुतळा पार्क संकल्पनेचं स्वागत करत त्यास मंजुरी दिली. विशेष म्हणजे तत्कालीन राज्य सरकारने पुतळा पार्कसाठी वैशिष्ट्यपूर्ण योजनेतून 15 लाख रुपयांचा निधीही देऊ केला होता.  


पुतळा पार्कवर सीसीटीव्हीतून नजर


या पुतळा पार्कला चारी बाजूंनी संरक्षण भिंत बांधलेली असून, या ठिकाणी पालिकेने तीन शिफ्टमध्ये सुरक्षा कर्मचारी नियुक्त केले आहेत, त्यांच्यासाठी तंबूची सोय आहे. तर, सीसीटीव्ही कॅमेऱ्याच्या माध्यमातून पोलिसांचीही पुतळा पार्कवर कायम नजर असते. 


हेही वाचा


आजही गणपती घरात येतो तो मुलगाच घेतो; बाप्पांच्या आगमनापूर्वीच प्रणिती शिंदेंची खंत, महिलांना आवाहन