रायगड : अन्याय आणि शोषणमुक्तीसाठी लढणाऱ्यांना छत्रपती शिवाजी महाराज हे प्रेरणेचं केंद्र आहेत. संघटीत शक्तीच्या आधारावर समाजाचा आत्मविश्वास वाढवला पाहिजे, असं मत सरसंघचालक मोहन भागवत यांनी व्यक्त केलं.


रायगडावर शिवपुण्यतिथीनिमित्त आयोजित कार्यक्रमात मोहन भागवत बोलत होते. ''छत्रपती शिवाजी महाराज हे मार्गदर्शक पुस्तक आहेत. त्यांनी चेतना, संकल्प, सद्गुण जागवले, त्यांनी कधीच भेदभाव केला नाही, हा अमूकची पूजा करतो, तो तमूकची पूजा करतो म्हणून भेद केला नाही,'' असंही मोहन भागवत म्हणाले.

दरम्यान, ''इथे स्मृतीदिनी पुढच्या वर्षी मोठ्या संख्येने या,'' असं आवाहनही मोहन भागवतांनी केलं. शिवरायांना विसरून भारताचं उत्थान शक्य नाही, असंही ते म्हणाले.

''जोपर्यंत रायगड उभा आहे, तोपर्यंत भारतात शिवाजी जन्मण्याची शक्यता आहे. शिवाजी घरोघर असण्याची आवश्यकता आहे आणि तो माझ्या घरी असला पाहिजे, आपल्यापासून सुरुवात केली पाहिजे,'' असं मोहन भागवत म्हणाले.

''आपल्या देशात आई-बहिणी सुखरूपणे सदा-सर्वदा रस्त्यावरून जातील याची शाश्वती नाही, हे कशामुळे झालं?, गडाची डागडुजी झाली तेव्हा सोन्याचा हंडा मिळाला, कोणी एक पैसा घरी नेला नाही आणि अशा आपल्या देशात भ्रष्टाचार विरोधात आंदोलन करण्याची पाळी आली हा दोष कुणाचा आहे,'' असा सवालही त्यांनी केला.

''छत्रपती शिवाजी महाराजांनी अनेक चांगल्या गोष्टी केल्या. राज्यव्यवहाराची भाषा बदलली. भारतीय भाषांमध्येच भारताचे व्यवहार झाले पाहिजेत,'' असंही मोहन भागवत म्हणाले.

राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे आणि त्यांच्या कन्या रायगड जिल्हा परिषदेच्या अध्यक्षा अदिती तटकरे यांनी या कार्यक्रमाला दांडी मारली. मोहन भागवत यांना कार्यक्रमाला बोलावल्यामुळे अदिती तटकरे वादात अडकल्या होत्या. अखेर यावर सुनील तटकरे यांनी स्पष्टीकरण दिलं होतं.

संबंधित बातम्या :

अदिती शिवपुण्यतिथी कार्यक्रमाच्या आयोजक नाहीत : सुनील तटकरे


रायगडावर शिवपुण्यतिथीनिमित्त विविध कार्यक्रमांचं आयोजन