जळगाव : जळगाव महापालिकेच्या महापौरपदी शिवसेनेच्या जयश्री महाजन यांची निवड झाली आहे. जयश्री महाजन यांना 45 मत पडली आहेत. तर भाजपच्या उमेदवार प्रतिभा कापसे यांना 30 मतं पडली. अधिकृत घोषणा थोड्याच वेळात होण्याची शक्यता आहे. महापौर निवडणुकीच्या अगोदरच सत्ताधारी भाजप मधील काही नाराज नगरसेवक गळाला लागल्याने महापौर शिवसेनेचाच होणार असा दावा करण्यात येत होता. 


इतिहासात पहिल्यांदाच जळगाव महानगरपालिकेवर शिवसेनेची एक हाती सत्ता स्थापन झाली आहे. या निवडणुकीसाठी शिवसेनेने भाजपचे 27 तर एम आय एम पक्षाचे तीन नगरसेवक फोडले होते. त्यामुळे मतदानाच्या वेळी शिवसेनेला 45 तर भाजपला 30 मते मिळाली. 
 

जळगाव महानगरपालिकेवर गेल्या अनेक वर्षात भाजपची सत्ता आहे. माजी मंत्री गिरीश महाजन यांचे जळगाव महानगरपालिकेवर वर्चस्व आहे. मात्र असे असताना देखील शिवसेना भाजपचे नगरसेवक फोडण्यात यशस्वी झाली. या सर्व तीस बंडखोर नगरसेवकांना ठाण्यातील एका हॉटेलमध्ये गेल्या दोन दिवसापासून ठेवण्यात आले होते. इथुनच ऑनलाईन पद्धतीने मतदान पार पडले. त्या मतदानानंतर जळगाव महानगरपालिकेवर जयश्री महाजन या महापौरपदी तर कुलभूषण पाटील हे उपमहापौरपदी विराजमान झाले आहेत. जळगाव प्रमाणेच ठाण्यातील हॉटेल मध्ये देखील या निवडणुकीनंतर शिवसेनेने मोठा जल्लोष साजरा केला. 

 

नगर विकास मंत्री एकनाथ शिंदे आणि नगरसेवक राम रेपाळे यांनी नगरसेवकांची जबाबदारी घेतली होती. त्यामुळेच सांगली महानगरपालिका नंतर भाजपला जळगाव महानगरपालिकेत देखील पराभवाला सामोरे जावे लागले आहे. काही महिन्यांपूर्वी भाजप सोडून राष्ट्रवादी काँग्रेस मध्ये आलेले एकनाथ खडसे यांचा देखील शिवसेनेचा विषयांमध्ये मोठा वाटा असल्याचे सांगण्यात येत आहे. त्यांच्यामुळे अनेक नगरसेवक भाजपमधून सेनेमध्ये आल्याची चर्चा आहे. तसेच राज्याचे पाणीपुरवठा मंत्री गुलाबराव पाटील हेदेखील या नगरसेवकांनी बरोबर हॉटेलमध्येच ठाण मांडून बसले होते. गेल्या अनेक वर्षात भाजपने केलेल्या खोट्या आश्वासनांमुळेच त्यांचे नगरसेवक बंडखोर झाल्याचे गुलाबराव पाटील यांनी एबीपी माझाशी बोलताना सांगितले आहे.