Maharashtra Vidarbha Rains : राज्यात कोरोनाचं संकट वाढत चाललं असताना आता अवकाळी पावसाचं संकट देखील समोर उभं राहिलं आहे. आज नागपूर, वर्ध्यासह विदर्भातील काही भागात अवकाळी पावसानं विजांच्या कटकडाटासह हजेरी लावली. यामुळं शेतकऱ्यांचं मोठं नुकसान झालं आहे. तर विदर्भासह राज्यातील अन्य भागातही 18 ते 21 मार्चदरम्यान वादळी वाऱ्यासह पावसाची शक्यता असल्याने शेतकरी राजाच्या चिंतेत भर पडली आहे. हवामानातील बदलामुळे विदर्भासह मराठवाडा आणि मध्य महाराष्ट्रात 18-21 मार्च दरम्यान वादळी वाऱ्यासह पावसाची शक्यता आहे.


वर्ध्यामध्ये शेतीपिकांचं मोठं नुकसान
वर्धा जिल्ह्याच्या कारंजा (घाडगे)  शहर आणि तालुक्यातील परिसरात 18 मार्च रोजी पहाटेच्या सुमारास विजांच्या कडकडाटांसह जोरदार अवकाळी पावसाने हजेरी लावली. वाऱ्यासह आलेल्या पावसामुळे शेतातील पिकांचं नुकसान झाल्याची शक्यता आहे. पावसामुळे कारंजा इथल्या बाजार समितीच्या आवारात असलेला शेतमाल भिजला. कारंजा परिसरात तसच तालुक्यातील काही भागात आज पहाटे जवळपास दोन तास जोरदार पाऊस झाला. सोसाट्याच्या वाऱ्यासह जोरदार आलेल्या पावसान रस्त्यावर पाणी वाहू लागल होतं. व्यापाऱ्यांनी खरेदी केलेला शेतमाल कृषी उत्पन्न बाजार समितीच्या आवारात ठेऊन होता. कृषी उत्पन्न बाजार समितीच्या आवारात असलेला शेतमाल अचानक आलेल्या पावसामुळ भिजला. यात गहू, चणा, तूर, सोयाबीन आदी जवळपास तीन हजार क्विंटल शेतमाल होता. यामुळं व्यापारी, शेतकऱ्यांचं नुकसान झालं आहे. 


अनेक भागात शेतात पिकं उभी
सध्या राज्यातील विविध भागात शेतात ज्वारी, गहू , हरभरा, संत्रा, फळभाज्या अशी पीक आहेत. ज्वारी, गहू, हरभरा काढणीला आले आहेत. वादळ, पावसामुळ या पिकांचं नुकसान होण्याची शक्यता आहे. जिल्ह्यात सर्वत्र ढगाळ वातावरण असून शेतकऱ्यांमध्ये या वातावरणामुळ काळजी निर्माण झाली आहे. मागील दोन दिवसांपासून वातावरणात बदल झाला आहे. हवामान खात्यानंही गारपीट, पावसाचा इशारा दिला आहे.   शेतकऱ्यांनी गहू, हरभरासह इतर पिकांची कापणी करून घेण्याचे कृषी विभागाने आवाहन केलं आहे. 
 
हवामान तज्ज्ञ के. एस. होसाळीकर यांनी ट्विट करत हवामानाचा अंदाज व्यक्त केला आहे.  होसाळीकर यांनी आपल्या ट्विटमध्ये म्हटलं आहे की, हवामानातील बदलामुळे विदर्भासह मराठवाडा आणि मध्य महाराष्ट्रात 18-21 मार्च दरम्यान वादळी वाऱ्यासह पावसाची शक्यता आहे.