Shiv Sena UBT MLA Rajan Salvi : शिवसेना ठाकरे गटाचे (Shiv Sena UBT) आमदार राजन साळवी (Rajan Salvi) यांच्यासह यांच्या कुटुंबीयांच्या अटकपूर्व जामीन अर्जावर आज सुनावणी होणार आहे.  एसीबीने गुन्हा दाखल केल्यानंतर राजन साळवींनी कुटुंबियांच्या अटकपूर्व जामीन अर्जासाठी कोर्टात धाव घेतली. जिल्हा सत्र न्यायालयाने अटकपूर्व जामीन फेटाळल्यानंतर साळवींनी मुंबई हायकोर्टात धाव घेतली.  याआधी 8 फेब्रुवारी रोजी सरकारी वकील उपलब्ध नसल्यानं आजची सुनावणी पुढे ढकलण्यात आली होती. आज मुंबई हायकोर्टात दुपारी बारानंतर अटकपूर्वक जामिनावर निर्णय होणार आहे. एसीबीनं राजन साळवी यांच्यासह पत्नी आणि मुलाविरोधात गुन्हा दाखल केला आहे. स्वत:ला अटकपूर्व जामीन अर्ज न घेण्यावर राजन साळवी अद्यापही ठाम आहेत. मुलगा आणि पत्नीसाठी ते कार्टात गेले आहेत. 


रत्नागिरी एसीबीनं शिवसेनेच्या ठाकरे गटाचे आमदार राजन साळवींसह त्यांची पत्नी आणि मुलाविरोधात रत्नागिरी शहर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल केला. त्यानंतर  पत्नी आणि मुलगा यांना अटकपूर्व जामीन मिळावा, यासाठी जिल्हा सत्र न्यायालयात जामीन अर्ज दाखल केला. पण, तो फेटाळला गेला. त्यानंतर साळवी यांनी मुंबई हायकोर्टात दाद मागितली असून त्यांच्या कुटुंबियांच्या अटकपूर्व जामीन अर्जावर आज दुपारी 12 नंतर सुनावणी होणार आहे. त्यामुळे साळवींच्या कुटुंबियांना हायकोर्टात अटकपूर्व जामीन मिळणार का? हे दुपारनंतर स्पष्ट होणार आहे. दरम्यान, रायगड एसीबीसह रत्नागिरी येथील एसीबी कार्यालयात राजन साळवी आतापर्यंत सात वेळा हजर राहिले आहे. त्यांनी आपल्या संपत्तीची माहिती देखील सादर केली आहे. आत्तापर्यंत साळवी यांचा भाऊ, पुतण्या, पत्नी, मुलगा, स्वीय सहाय्यक यांची चौकशी झाली आहे. 


राजन साळवी यांच्यावर आरोप काय आहेत?


ऑक्टोबर 2009 ते २ डिसेंबर 2022 पर्यंत 14 वर्षात बेहिशेबी मालमत्ता जमा केल्याचा आरोप साळवींवर ठेवण्यात आला आहे. साळवी यांच्याकडे 3 कोटी 53 लाख इतकी या बेहिशेबी मालमत्तेची रक्कम सापडल्याचा आरोप त्यांच्यावर आहे. साळवी यांची मूळ संपत्ती अंदाजे 2 कोटी 92 लाख रुपये इतकी आहे. बेहिशेबी मालमत्तेचा आकडा हा 118 टक्के इतका जास्त असल्याचा आरोप आहे. 


यापूर्वी राजन साळवी यांनी सहा ते सातवेळा एसीबी चौकशीसाठी अलिबाग येथील कार्यालयामध्ये हजर लावली होती. तसेच त्यांचा भाऊ, पुतण्या, वहिनी, स्वीय सहाय्यक यांनाही नोटीस पाठवण्यात आली आहे. एसीबीने राजन साळवी यांच्यासह त्यांची पत्नी आणि मोठा मुलगा यांच्या विरोधात गुन्हा दाखल केला आहे.  


राजापुरातून साळवींची हॅट्ट्रिक 


राजन साळवी रत्नागिरी जिल्ह्यातील राजापूर विधानसभा मतदारसंघातून आमदार आहेत. गेल्या तीन टर्ममध्ये ते आमदार राहिले आहेत 2009, 2014 आणि 2019 अशा तीनवेळा ते राजापूर मतदारसंघातून निवडून आले आहेत.