Maharashtra Politics नागपूर : गेल्या लोकसभा निवडणुकीत महाविकास आघाडीला विदर्भात मोठे यश आल्याचे बघायला मिळाले आहे. एकट्या विदर्भातील 10 पैकी 7 ठिकाणी महाविकास आघाडीने घवघवीत यश मिळवत पुन्हा घरवापसी केली आहे. तर आगामी विधानसभा निवडणुकीमध्ये (Maharashtra Assembly Election 2024) विदर्भात भाजपचा (BJP) ग्राफ सतत खाली येत असल्याचे चित्र आहे. 2014 मध्ये विधानसभेत 44 जागा तर 2019 मध्ये 29 जागा भाजपने जिंकल्या होत्या. त्यामुळे आता 2024 मध्ये विदर्भातून भाजपच्या आधिक जागा वाढवण्यासाठी अमित शाह पक्षाच्या रणनीतीचा आढावा घेण्यासाठी नुकतेच येऊन गेले आहेत.


त्याच अनुषंगाने आगामी विधानसभा निवडणुकीतही महायुतीकडून वेगळी रणनीती आखली जात असताना आता शिवसेना ठाकरे गटानेही विदर्भात आपली ताकद आजमावल्याचे चित्र आहे. किंबहुना पूर्व विदर्भातील 28 पैकी 14 जागांवर शिवसेना ठाकरे गटाकडून दावा करण्यात आला आहे.


पूर्व विदर्भातील 28 पैकी 14 जागांवर शिवसेना ठाकरे गटाकडून दावा


उद्धव ठाकरे गटाचे नेते आणि आमदार भास्कर जाधव हे सध्या विदर्भाच्या दौऱ्यावर आहेत. नुकताच त्यांनी पूर्व विदर्भातील पदाधिकाऱ्यांसोबत आढावा बैठक घेतलीय. दरम्यान, पूर्व विदर्भातील 28 विधानसभा मतदारसंघाचा शिवसेना ठाकरे गटाकडून आढावा घेतला जात आहे. त्यातील 8 ते 10 जागांची आमची मागणी असल्याचे वक्तव्य आमदार भास्कर जाधव यांनी केलं आहे. यात नागपूर जिल्हात 5 जागेवर उबाठाचा दावा केला असून रामटेक, कामठी, उमरेड आणि शहरातील नागपूर दक्षिण आणि नागपूर पूर्वची मागणी आम्ही करणार असल्याचेही ते म्हणाले.


दरम्यान, उद्या उद्धव ठाकरे हे नागपूर जिल्ह्यातील कळमेश्वरला येणार  आहे. पूर्व विदर्भातील जागाबाबत शक्य झाले तर उद्धव ठाकरे यांच्याशी चर्चा करून अंतिम निर्णय घेऊ, असेही ते म्हणाले. सोबतच मी बरीचशी काम पितृपक्षात करतो. उद्या जर यादी जाहीर झाली तरी अशुभ असेल असे मी तरी मानत नसल्याचेही आमदार भास्कर जाधव म्हणाले.


रामटेक विधासभेच्या जागेवरुन दोन गाटात नारेबाजी 


दुसरीकडे नागपूर जिल्ह्यातील रामटेक विधासभेच्या जागेवरुन करण्यात आलेल्या दाव्याला घेऊन उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाच्या दोन गटाची समोरासमोर नारेबाजी झाल्याचे बघायला मिळाले आहे. विशाल बरबटे आणि माजी खासदार प्रकाश जाधव या दोन्ही नेत्यांनी रामटेक विधासभेच्या जागेची पक्षाकडे मागणी केली आहे. मात्र यावर अंतिम निर्णय व्हायचा असला तरी कार्यकर्ते आपल्या नेत्याला तिकीट मिळावी यासाठी आक्रमक झाल्याचे दिसत आहे. आज भास्कर जाधव यांनी नागपुरातील रवी भवन येथे आढावा बैठक ठेवली होती. तेव्हा हे दोन्ही गट समोरासमोर आल्यानंतर आपापल्या नेत्याच्या विजयाचा जयघोष कार्यकत्यांनी केला. त्यामुळे काही क्षणासाठी वातावरण गंभीर झाले होते.


हे ही वाचा