Snehal Jagtap : शिवसेना ठाकरे गटाच्या नेत्या स्नेहल जगताप (Snehal Jagtap) या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात प्रवेश करण्याची शक्यता आहे. त्या भाजपच्या वाटेवर असल्याच्या चर्चा सुरु होत्या. पण आज त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे (Sunil Tatkare) यांची मुंबईतील सह्याद्री अतिथीगृह येथे भेट घेतली. या बैठकीनंतर स्नेहल जगताप माध्यमांशी संवाद न साधता निघून गेल्या. तर सुनील तटकरे यांच्याकडे स्नेहल जगताप यांची भेट ही कौटुंबिक असल्याची माहिती देण्यात आली आहे.  


स्नेहल जगताप सध्या उद्धव बाळासाहेब ठाकरे गटात असून लवकरच भाजप मधे जाणार अशा मागच्या महिनाभरापासून चर्चा आहेत. मात्र, आता त्या राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश करण्याची शक्यता वर्तवली जात आहे. सुनिल तटकरे यांच्याशी त्यांची चर्चा झाल्चां देखील बोलले जात आहे. 


कोण आहेत स्नेहल जगताप ?


स्नेहल जगताप या महाडच्या माजी नगराध्यक्ष आहेत. त्यांनी मे 2023 मध्ये काँग्रेसमधून ठाकरे गटात प्रवेश केला होता. स्नेहल जगताप या काँग्रेसच्या सरचिटणीस म्हणून कार्यरत होत्या. शिवाय काँग्रेसमधून त्यांनी शिवेसेनेत प्रवेश केल्यानंतर महाडमध्ये ठाकरेंच्या शिवेसेनेची ताकद वाढली होती. स्नेहल जगताप या माजी आमदार माणिकराव जगताप यांच्या कन्या आहेत. शिवसेनेत फुट पडल्यानंतर त्यांनी मातोश्रीवर जात ठाकरेंना साथ देण्याचा निर्णय घेतला होता. आगामी विधानसभा निवडणुकीत भरत गोगावले यांच्यासमोर स्नेहल जगताप यांचे कडवे आव्हान असणार आहे. ठाकरे गटात प्रवेश करताना महाविकास आघाडी हेच माझे घर असल्याचेही जगताप म्हणाल्या होत्या.


2024 च्या विधानसभा निवडणुकीत स्नेहल जगताप यांनी शिवसेना ठाकरे गटाकडून महाड विधानसभा मतदारसंघातून निवडणूक लढवली होती. त्यांच्या विरोधात शिवसेना शिंदे गटाकडून भरत गोगावले मैदानात होते. गोगावले यांनी त्यांचा पराभव केला होता. गेल्या काही दिवसांपासून ठाकरेंच्या शिवसेनेला धक्क्यांवर धक्के बसत आहेत. अनेक नेत्यांसह पदाधिकारी शिवसेना ठाकरे गटाला सोडचिठ्ठी देत असल्याचं चित्र पाहायला मिळत आहे. गेल्या काही दिवसापूर्वीच माजी आणदार राजन साळवी यांनी ठाकरे गटाला जय महाराष्ट्र करत शिवसेना शिंदे गटात प्रवेश केला होता. त्यानंतर संजय कदम हे देखील शिवसेना ठाकरे गटाला सोडचिठ्ठी देण्याच्या तयारीत आहेत. लवकरत ते देखील शिवसेना शिंदे गटात प्रवेश करणार असल्याचं बोललं जात आहे.  


महत्वाच्या बातम्या:


भरत गोगावलेंना मोठा धक्का, माजी आमदाराच्या मुलाचा ठाकरे गटात प्रवेश, स्नेहल जगताप यांची ताकद वाढली