मुंबई : मराठीच्या मुद्यावरुन राज्यातील राजकीय वातावरण चांगलच तापल्याचं पाहायला मिळत आहे. राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे नेते भैय्याजी जोशी (Bhaiyyaji Joshi) यांनी मराठीबाबत केलेल्या वक्तव्याच्या विरोधात शिवसेना ठाकरे गट (Shivsena Thackeray Group) आक्रमक झाला आहे. आता दुकानांच्या मराठी (Marathi) पाट्यानंतर, मुंबईतील हॉटेल्स, उपहारगृह, दुकान मालकांनी मेन्यू कार्ड देखील मराठीत करण्याचा आग्रह शिवसेना ठाकरे गटानं केला आहे. मुंबई जिल्हाधिकाऱ्यांनी मराठीत मेन्यू कार्ड आणि हॉटेल बिल करण्यासाठी सूचना द्याव्यात, अशी मागणी शिवसेना ठाकरे गटाकडून जिल्हाधिकाऱ्यांना पत्राद्वारे करण्यात आली आहे.
इतर राज्यात ज्याप्रमाणे स्थानिक व्यावसायिक, दुकानदार हॉटेल मालक उपाहारगृहामध्ये भोजनसूची, मेन्यू कार्ड वर स्थानिक भाषेला प्राधान्य देतात. मात्र मुंबईत महाराष्ट्रमध्ये परिस्थिती काही प्रमाणात वेगळी असून येथे अनेक ठिकाणी मेन्यू कार्ड किंवा हॉटेल बिल देताना इंग्रजी भाषेला प्राधान्य दिले जाते. त्यामुळे मुंबईतील सर्व हॉटेल्स, उपहारगृहमधील मेन्यू कार्ड वर त्यासोबतच हॉटेल बिल वर मराठी भाषेचा वापर करावा, अशी मागणी ठाकरेंच्या शिवसेनेचे उपविभाग प्रमुख कृष्णा पवळे यांनी जिल्हाधिकाऱ्यांना पत्र लिहून केली आहे.
नेमकं काय म्हणाले होते भैय्याजी जोशी?
मुंबईत विविध राज्य, प्रांत आणि भाषा बोलणारे नागरिक राहतात. मुंबईत अनेक भाषा आहेत आणि घाटकोपरची भाषा गुजराती आहे, त्यामुळे मुंबईत येणाऱ्या प्रत्येकाला मराठी शिकलं पाहिजे असं नाही. राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या शाखेत काम करणारा प्रत्येकजण ईश्वरी कार्य करत आहे. स्वयंसेवक नावाची ही शक्ती आहे, त्या शक्तीच्या रूपाने प्रत्येकजण काम करतो. जे स्वतःसाठी जगतात ते पशु समान असतात आणि दुसऱ्यासाठी जगतात ते खरे आयुष्य जगतात आणि त्यांनाच मनुष्य म्हणावे, असे भय्याजी जोशी यांनी म्हटले होते.
भैय्याजी जोशींच्या वक्तव्यावर काय म्हणाले मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस?
भय्याजी जोशींचं वक्तव्य मी ऐकलेलं नाही. ते मी ऐकून त्यावर मी बोलेन. मुंबईतील आणि महाराष्ट्राची भाषा मराठीच आहे. महाराष्ट्रात राहणाऱ्या प्रत्येकाने मराठी भाषा शिकली पाहिजे, त्याला समजली पाहिजे. इतर भाषांचा इथे सन्मान आहे, कुठल्याही भाषेचा आम्ही अपमान करणार नाही. जो स्वत:च्या भाषेवर प्रेम करतो तोच इतरांच्या भाषेवर प्रेम करु शकतो, असे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी म्हटले आहे.
महत्वाच्या बातम्या: