मुंबई : राष्ट्रवादी काँग्रेसचे शिरुरचे खासदार डॉ. अमोल कोल्हे यांनी एका कार्यक्रमात उद्धव ठाकरे हे शरद पवार यांच्या आशिर्वादामुळेच मुख्यमंत्रीपदावर असल्याचे विधान केले होते. यावर आता शिवसेना प्रवक्ते किशोर कान्हेरे यांनी प्रत्युत्तर दिले आहे. खासदार अमोल कोल्हे यांनी अकलेचे तारे तोडले असून आपल्या बुद्धीचे सामूहिक दर्शन घडवले असल्याची टीका कान्हेरे यांनी केली. अमोल कोल्हे म्हणतात शरद पवार यांच्या आशिर्वादाने उद्धव ठाकरे मुख्यमंत्री आहेत मग राष्ट्रवादी कोणाच्या सहकार्याने सत्तेत आहे? असा प्रश्न कान्हेरे यांनी विचारला आहे. 


काय म्हणाले किशोर कान्हेरे?
अमोल कोल्हे यांच्या स्मरणशक्तीच्या परीक्षेची वेळ आलीय बहुतेक, तयार स्क्रिप्ट वाचून बडबड करणारे कलावंत कधी कधी स्मरणशक्ती विसरतात तसेच अमोल कोल्हे यांचे आज झाले, आपण ज्या उद्धवसाहेबांच्या मेहेरबानीमुळे राजकारणात आलो, त्यांनाच ते आज विसरले. अंगापेक्षा पोंगा जास्त झाला की होते असे, अहो कोल्हे ज्या उद्धव साहेबांमुळे आपल्याला आणि आपल्या पक्षाला सत्तेची फळे चाखायला मिळाली किमान त्यांना तरी विसरू नका, उपमुख्यमंत्री अजित पवार आणि दस्तूर खुद्द शरद पवार साहेब सतत उद्धव साहेबांशी सल्ला मसलत करत राज्य कारभार चालवत आहेत. तुम्ही कशाला फार विचार करता. तेवढी तुमची कुवत पण नाही आणि क्षमता पण, दिग्दर्शकाने लिहून दिलेली स्क्रिप्ट वाचा आणि अभिनय करून पोटापाण्याचे पहा, फार डोके चालवू नका असा सल्ला देत शिवसेना प्रवक्ता किशोर कान्हेरे यांनी खासदार अमोल कोल्हे यांची खरडपट्टी काढली आहे. 


काय म्हणाले होते अमोल कोल्हे
शरद पवारांचा आशीर्वाद आहे म्हणून उद्धव ठाकरे मुख्यमंत्रीपदावर असे वक्तव्य करताना, लॉकडाउनमुळे कार्यक्रम होत नव्हते म्हणून बऱ्याच जणांना व्यक्त व्हायचं होतं. राजकारण हे फक्त निवडणुकांपुरतं असणं गरजेचं आहे. निवडणुका संपल्या की राजकारण संपलं पाहिजे. मात्र, महाराष्ट्रात आपण एक प्रवृत्ती अनुभवतोय. ती राज्य पातळीवर पण अनुभवतोय तीच आपण शिरूर मतदार संघातही अनुभवतोय. दुर्दैवाने ती जुन्नर तालुक्यातही अनुभवायला मिळतंय. वयस्कर नेत्यांनं असं पोरकटपणाने वागणं याचं मला आश्चर्य वाटतं, असे अमोल कोल्हे शिरूर येथे बोलले. त्याबाबत प्रतिक्रिया देताना शिवसेना प्रवक्ते किशोर कान्हेरे यांनी अमोल कोल्हे यांची खरडपट्टी काढली. कलाकार आहात कलाकारच राहा उगाच राजकारणी बनण्याचे नाटक करू नका, असा सल्लाही त्यांनी शेवटी खासदार अमोल कोल्हे याना दिला.