रत्नागिरी  : "शिवसेनेसाठी अनेक लोकांना आम्ही अंगावर घेतलं. नारायण राणे यांनी शिवसेना सोडल्यावर मला गाडीत पुढं घेतल्याशिवाय वर्षभर उद्धव ठाकरे घराबाहेर पडत नव्हते. काही झालं तर पहिली गोळी रामदास कदम खाईल याची आमची तयारी होती. बाळासाहेब ठाकरे रामदास करमांसारख्या वाघाला सांभाळायचे. पण उद्धव ठाकरे सुभाष देसाईंसारख्या शेळीला सांभाळत आहेत. दाऊला देखील घाबलो नाही तर भास्कर जाधवसारख्यांना तुम्ही घेऊन येत आलात तर आम्ही बिलकूल घाबरणार नाही, असा टोला शिवसेना शिंदे गटाचे नेते रामदास कदम (Ramdas Kadam ) यांनी लगावला आहे. 


रत्नागिरीमधील खेड येथील गोळीबार मैदानावर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची आज सभा होत आहे. यावेळी रामदास कदम बोलत होते. रामदास कदम यांनी यावेळी उद्धव ठाकरे यांच्यावर जोरदार टीका केली. "माशाच्या पिल्लाला पोहायला शिकवायला लागत नाही हे योगेश कदम यांनी आज दाखवून दिले आहे. बाळासाहेब ठाकरे यांनी शिवसेनेला जन्म दिला एवढंच उद्धव ठाकरे खरं बोलत आहेत. परंतु, काँग्रेससोबत सत्तेत गेलो तर शिवसेना नावाचं दुकान मी बंद करून टाकेन असे देखील बाळासाहेब ठाकरे यांनी म्हटलं होतं. बाळासाहेब ठाकरे यांनी सांगितलं होतं की सोनिया गांधींसोबत कधीच जाणार नाही. मग उद्धव ठाकरे यांनी त्यांच्या विचारांसोबत गद्दारी का केली? असा हल्लाबोल रामदास कदम यांनी यावेळी केला. 


'मुख्यमंत्री होईन म्हणून मला पाडलं'


विरोधी पक्षनेता हा मुख्यमंत्री होऊ शतकतो. परंतु, मी मुख्यमंत्री होऊ नये म्हणून 2009 ला उद्धव ठाकरे यांनी मला पाडलं. त्यावेळी दापोली मतदारसंघातून मी तिकीट मागितलं असताना मला गुहागरमधून तिकीट देऊन मला पाडलं. उद्धव ठाकरे यांनी मला त्यावेळी गाफील ठेवून धोका दिला. दापोलीत देखील योगेश कदम यांना पाडण्यासाठी उद्धव ठाकरे यांनी प्रयत्न केले. योगेश कदम यांना कसं संपवायचं या कटात उद्धव ठाकरे सामील होते, असा आरोप यावेळी रामदास कदम यांनी केला.  


...त्याशिवाय गप्प बसणार नाही


"आम्ही स्वच्छ हाताने जगलोय. कोठेही डाग लावून घेतला नाही आणि मरेपर्यंत डाग लावून घेणार नाही. पण श्रीलंका, लंडन आणि शिंगापूरला कोणाची हॉलेटल आहेत हे एक दिवस समोर आणल्याशिवाय हा रामदास कदम शांत बसणार नाही, असा इशारा यावेळी रामदास कदम यांनी उद्धव ठाकरे यांना दिला. 



'कोकणची जणता एकनाथ शिंदेंच्या मागे'


"कोकणची जणता मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या पाठिमागे ठाम उभा आहे हे आज येथील जनतेने दाखवून दिले आहे. दिवसरात्र काम करणारे एकनाथ शिंदे हे राज्याला लाभलेले पहिले मुख्यमंत्री आहेत, असे कौतुक यावेळी रामदास कदम यांनी मुख्यमंत्र्यांचं केलं.