मुंबई : केंद्रीय मंत्री नारायण राणे आणि शिवसेनेतील वाद शमण्याची चिन्हं दिसत नाहीयत. आज शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी सामनाच्या रोखठोक सदरातून राणेंवर पुन्हा हल्लाबोल केला आहे. केंद्रातले एक मंत्री नारायण राणे महाराष्ट्रात भाजपाच्या जन आशीर्वाद यात्रेसाठी आले. त्या यात्रेची त्यांनी येड्यांची जत्रा केली. मोदी सरकारातील अनेक मंत्री देशभरात अशा जन आशीर्वाद यात्रा करीत फिरत आहेत. महाराष्ट्रात भागवत कराड, भारती पवार, कपिल पाटील फिरत आहेत. त्या सर्व यात्रा सुरळीत पार पडत आहेत. फक्त राणे यांनी परंपरेने गोंधळ घातला. त्यामुळे मोदींच्या यात्रेचे महत्त्वच नष्ट झाले, अशी टीका संजय राऊतांनी केली आहे,
लेखात म्हटलं आहे की, राणे इतक्या वर्षांत कधी शिवतीर्थावरील शिवसेनाप्रमुखांच्या स्मृतिस्थळावर गेले नाहीत, पण आता जन आशीर्वाद यात्रेच्या सुरुवातीला गेले. हा त्यांच्या राजकारणाचा व शिवसेनेस डिवचण्याचा भाग होता. स्मृतिस्थळावरून राणे म्हणाले, ‘‘आज बाळासाहेब असते तर त्यांनी मला आशीर्वाद दिले असते.’’ राणे यांचे हे विधान हास्यास्पद आहे, असं लेखात म्हटलं आहे.
महाराष्ट्रात गेल्या दोन वर्षांपासून जे घडवले जात आहे ते महाराष्ट्राच्या संस्कृतीला शोभणारे नाही. भारतीय जनता पक्षाने महाराष्ट्रात सत्ता गमावली हे दुःख समजू शकतो. पण म्हणून महाराष्ट्रातील टोलेजंग व्यक्ती व राज्याच्या संस्कृतीवर हल्ला करत राहणे योग्य नाही. भारतीय जनता पक्षाची हळद लावलेला एक नवाकोरा आमदार देशाचे ज्येष्ठ नेते शरद पवार यांच्यावर घाणेरडय़ा भाषेत जाहीर विधान करतो व प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील त्यावर फक्त सारवासारवी करून अप्रत्यक्ष अशा बेतालपणास फूस देतात. हे कसले संस्कार? उद्धव ठाकरे व इतरांवर धोरणात्मक टीका करणे समजू शकतो. तो लोकशाहीने दिलेला अधिकार आहे, पण राणे व त्यांची दोन्ही मुले राज्याचे मुख्यमंत्री असलेल्या ठाकरे यांच्याविषयी जी भाषा वापरतात तो भाजपच्या नव्या संस्कृतीचा उदय आहे, अशी टीका संजय राऊतांनी केली आहे.
महाराष्ट्रात भारतीय जनता पक्ष विरोधी बाकावर आहे. विरोधात बसणे त्यांना कमीपणाचे वाटते. त्याच न्यूनगंडातून भाजपा राज्य सरकारवर घाणेरडय़ा पद्धतीने हल्ले करीत आहे. स्वतः हल्ले करून थकले तेव्हा ते काम त्यांनी बाहेरून आलेल्या राणे यांच्यासारख्या नेत्यांना दिले. राणे जे करीत आहेत त्यामुळे जत्रेचा तंबूच उधळला गेला. सार्वजनिक जीवनातील व्यक्तीने परंपरा, प्रतिष्ठा सोडली की काय घडते, याचा अनुभव सध्या महाराष्ट्र घेत आहे. गेले चारेक दिवस इलेक्ट्रॉनिक मीडियाला चोवीस तास रटरटणारे खाद्य मिळाले, पण राज्याची इभ्रत या सर्व प्रकरणात मातीमोल झाली. केंद्रीय मंत्री राणे हे गेली वीस वर्षे शिवसेना व उद्धव ठाकरेंवर असंसदीय भाषेत बोलत आहेत. शिवसेनेच्या नेत्यांवर ते व त्यांचे चिरंजीव असभ्य भाषेत बोलत असतात. त्याची दखल कोणी घेत नाही, पण राणे आता केंद्रीय मंत्री आहेत व उद्धव ठाकरे हे महाराष्ट्राचे मुख्यमंत्री आहेत. मुख्यमंत्री ठाकरे यांना थोबाडीत मारण्याची भाषा केंद्राचे एक मंत्री असलेले राणे करतात व त्यांच्या बाजूला बसलेले भाजपचे पुढारी हतबलतेने ही नौटंकी पाहतात, असं संजय राऊत यांनी लिहिलं आहे.