पालघर : स्वतःवरच गोळीबाराचा कट रचल्याप्रकरणी पालघर शहरातील शिवसेनेचा उपशाखा प्रमुख व बॅनर व्यवसायिक राजेश घुडे उर्फ बाळा याला पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. पालघर न्यायालयाने त्याला दहा डिसेंबरपर्यंत पोलिस कोठडी सुनावली आहे. काही महिन्यांपूर्वी राजेश घुडे याच्यावर गोळीबार झाल्याची घटना दांडेकर कॉलेज रस्ता परिसरात घडली होती. काही अज्ञात इसमांनी त्याच्या गाडीवर गोळीबार केल्याचे त्यांनी तक्रारीत नमूद केले होते. अनेक महिने उलटूनही पोलीस तपासामध्ये आरोपी हाती लागत नव्हते. अखेर पोलिसांनी तपास चक्रे अधिक गतीने फिरवून पुरावे गोळा करायला सुरुवात केली. त्यामध्ये घुडे याने स्वतःवरच गोळीबाराचा कट रचल्याचे समोर आले.
पालघर पोलिसांनी त्याला शनिवारी रात्री ताब्यात घेतले. त्याची कसून चौकशी केली असता त्याने हा कट रचला असल्याचे पुरावे पोलिसांना मिळाल्याची माहिती पालघरच्या पोलीस उप अधीक्षकांनी दिली. पोलिसांनी आरोपी म्हणून त्याला आज न्यायालयात हजर केले व न्यायालयाने त्याला दहा डिसेंबरपर्यंत पोलीस कोठडी दिली. बंदुकीचा परवाना मिळावा यासाठी तो अनेक खटाटोप करीत होता अशी चर्चा सर्वत्र आहे. या प्रकरणी 307,429,120 ब, एनिमल ऍक्ट 1960,आर्म ऍक्ट प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला
नेमका काय बनाव केला?
पालघरमधील बॅनर व्यावसायिक आणि शिवसेना उप शाखा प्रमुख याच्यावर काही महिन्यांपूर्वी पालघर खारेकुरण रस्त्यावर कार घेऊन जात असताना दोन बाईक सवार अज्ञात व्यक्तीने त्याच्यावर गोळीबार केल्याची घटना घडल्याचं त्यानं सांगितलं होतं. गोळीबारात घुडे बालंबाल बचावला होता आणि गोळी कारच्या मागच्या विंडो ग्लासला लागली होती. पोलिसांनी सदर घटनेचा गुन्हा दाखल करून तपास सुरू केला होता. तपासात राजेश घुडे उर्फ बाळा यानेच बनाव करून स्वतःवर गोळीबार केल्याचा उघड झाल्याने पोलिसांनी पालघर ठाण्यात आरोपी राजेश घुडे वर 307,429,120 ब, एनिमल ऍक्ट 1960,आर्म ऍक्ट प्रमाणे गुन्हा दाखल करून पालघर न्यायालयात हजर केले. न्यायालयाने आरोपी राजेश घुडे याला 10 डिसेंबरपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे.या गोळीबार प्रकरणात इतरही आरोपी असल्याची शक्यता असल्याने पोलीस पुढील तपास करत आहेत.
संबंधित बातम्या
Palghar Accident:डहाणूमध्ये पोलीस निरीक्षकाच्या गाडीनं दोघांना उडवलं,API सुहास खरमाटेंवर गुन्हा दाखल