मुंबई :  एखाद्या फाळणीविरोधी गोडसेने पाकिस्तानचा रेटा लावणाऱ्या जीनांवर पिस्तुल रिकामे केले असते तर फाळणीचा स्मृतिदिन साजरा करण्याची वेळ 75 वर्षांनंतर आली नसती, असं खासदार संजय राऊतांनी सामनाच्या रोखठोक सदरात म्हटलं आहे. लेखात म्हटलं आहे की, ब्रिटिशांनी जीनांना पाकिस्तान मिळवून दिले. जीनांनी पाकिस्तान मिळविला नाही. वकिली डावपेच लढवून, हिंदूंना शिवीगाळ करून त्यांनी पाकिस्तान मिळविला. पाकिस्तानची निर्मिती होत असताना जीना यांच्या समर्थकांनी सुरू केलेल्या राक्षसी कत्तली ते थांबवू शकले नाहीत. लक्षावधी हिंदू आणि मुसलमान प्रजा निर्वासित होऊन देशोधडीस लागली. माणसांचे विभाजन झाले. जमिनीचे तुकडे पडले. लष्कर, संपत्ती, पैसे म्हणजे गंगाजळीची वाटणी झाली. पुन्हा इतके होऊनही दोन्ही देशांत एकमेकांमध्ये कधीच शांतता नांदू शकली नाही असं संजय राऊतांनी म्हटलं आहे.


त्यांनी म्हटलं आहे की, फाळणी ही आपत्तीच होती व आज ना उद्या देश अखंड होईल या आशावादावर मोठा वर्ग आजही जगात आहे. काही लोक गांधीहत्या करणाऱ्या पंडित गोडसेंच्या प्रतिमेची आजही पूजा करतात. त्यांच्या फाशी दिवसाचा सोहळा साजरा करतात. गोडसेंना श्रद्धांजली म्हणून गांधीच्या प्रतिमेवर गोळ्य़ा झाडून पुनःपुन्हा गांधीहत्येचा आनंद साजरा करतात. फाळणी नको असे सांगणारे, लिहिणारे मूठभर लोक तेव्हाही अगदी याच पद्धतीने वागत व जगत होते. त्या काळात एखाद्या फाळणीविरोधी गोडसेने पाकिस्तानचा रेटा लावणाऱ्या जीनांवर पिस्तुल रिकामे केले असते तर फाळणीचा स्मृतिदिन साजरा करण्याची वेळ 75 वर्षांनंतर आली नसती. गोडसेने निःशस्त्र गांधींना मारले. कारण त्यांच्या दृष्टीने फक्त तेच एकमेव फाळणीचे गुन्हेगार होते. मग जीना कोण होते? बॅ. जीनांनी फक्त एक टाईपरायटर,वकिली कौशल्यावर देशाची फाळणी घडवून पाकिस्तान मिळविला. गोडसेसारख्यांनी जीनांना संपवले असते तर देशाचे अखंडत्व नक्कीच टिकले असते, असंही राऊतांनी म्हटलं आहे. 


हिंदुस्थानची फाळणी हा एक भयपट 
हिंदुस्थानची फाळणी हा एक भयपट होता. फाळणीच्या वेळी दोन्ही देशांच्या सीमेवरील प्रांतांमध्ये झालेल्या अमानुष हिंसेने स्वातंत्र्याचा पहिला दिवस रक्ताने भिजला होता. पंडित नेहरू स्वातंत्र्य दिनाच्या भाषणाची जुळवाजुळव करीत बसले होते. सोबत इंदिरा गांधी होत्या. इतक्यात बाजूच्या खोलीतला फोन वाजला. नेहरू आत गेले. ते फोनवर बोलू लागले, पण समोरून नीट ऐकू येत नव्हते. नेहरू वारंवार समोरच्या व्यक्तीस सांगत होते, ‘पुन्हा सांग! पुन्हा सांग!’ नेहरूंनी  फोन ठेवला व काळवंडलेल्या चेहऱ्याने ते खुर्चीवर येऊन बसले. इंदिराजींनी विचारले, ‘‘काय झाले? कुणाचा फोन होता?’’ ‘‘लाहोरचा फोन होता.’’ नेहरूंना सांगताना हुंदका फुटला. ते म्हणाले, ‘‘लाहोरच्या हिंदी वसाहतीमधील पाणी पुरविणाऱ्या सर्व लाइन्स दंगलखोरांनी तोडल्या आहेत. सकाळपासून तेथील लहान मुले, आबालवृद्ध पाण्यासाठी वणवण करीत आहेत. हे काय चाललंय? मी रात्री देशवासीयांना भाषणात काय सांगू? त्यांना कसे तोंड दाखवू?’’


मोदींनी दिला नवा कार्यक्रम
पंतप्रधान मोदी यांनी देशाला आणखी एक नवा कार्यक्रम दिला. 14 ऑगस्ट हा फाळणीचा स्मृती दिवस पाळायचा असे त्यांनी ठरवून टाकले. म्हणजे 15 ऑगस्टला स्वातंत्र्य दिनाचा आनंद सोहळा व 14 ऑगस्ट म्हणजे एक दिवस आधी फाळणीच्या दुःखद आठवणींना उजाळा देण्याचा दिवस. एका देशाचे अस्तित्व आणि अखंडत्व खतम होण्याची वेदना काय असते ते आज आपण अफगाणिस्तानात अनुभवत आहोत. अराजकाच्या नरकात तो संपूर्ण देश आक्रोश करतोय. देशाला नरकात ढकलून अफगाणिस्तानचे राज्यकर्ते पळून गेले आहेत. आपल्याला स्वातंत्र्य मिळत असतानाही काय घडत होते? देशाची फाळणी होऊ नये व देश अखंड राहावा असे वाटणारी मंडळी त्यावेळी काय करीत होती? प्रा. नरहर कुरंदकर यांच्या शब्दांत सांगायचे तर, ‘‘अखंड भारतवाल्यांनी लढाच दिला नाही. अखंड भारत टिकविण्याची लढाई देण्यापूर्वी ज्या मंडळींनी मुस्लिम लीगचा द्विराष्ट्रवादाचा सिद्धांत मान्यच करून टाकला त्याचे वर्णन कोणत्या शब्दांत करावे? अखंड हिंदुराष्ट्रवाल्यांनी नेमके हेच कार्य केले. अखंड हिंदुस्थानचा जयघोष करत या मंडळींनी द्विराष्ट्रवाद म्हणजेच ‘फाळणी’ मान्य केली आणि अखंड हिंदुस्थान टिकविण्यासाठी लढण्याऐवजी युद्धापूर्वीच रणातून पळ काढला. पराक्रमी जखमी वीराला तो पराभूत झाला म्हणून सज्जात बसून चकाट्य़ा पिटणाऱ्यांनी हिणवावे अशातलाच हा प्रकार होता. म्हणजेच एरव्ही जे लढताना मेले आणि जे अंथरुणावर झोपी गेले त्या दोघांनाही सारखेच वंदनीय ठरविण्यात अर्थ नसतो!