मुंबई :  पत्राचाळ गैरव्यवहाराप्रकरणी (Patra Chawl Land Scam)  शिवसेनेचे खासदार संजय राऊत (Sanjay Raut Bail) यांना अखेर 100 दिवसानंतर जामीन मंजूर झाला आहे.  त्यानंतर राजकीय वर्तुळातून प्रतिक्रिया येण्यास सुरूवात झाली आहे. ठाकरे गटाच्या उपनेत्या सुषमा अंधारे (Sushna Andhare) यांनी  ट्विट करत न्यायलयाच्या निर्णयाचे स्वागत केले आहे. 'टायगर इज बॅक' अशी प्रतिक्रिया दिली आहे. 


आज आमच्यासाठी दिवाळीचा क्षण असून शिवसैनिकांमध्ये हजार हत्तीचे बळ संचारले आहे, अशी प्रतिक्रिया सुषमा अंधारे यांनी एबीपी माझाला दिली आहे. सुषमा अंधारे म्हणाल्या,  शिवसैनिकांमध्ये आज हजार हत्तीचे बळ संचारले संजय राऊतांचा आम्हाला अभिमान आहे. आज आमच्यासाठी दिवाळीचा क्षण आहे. आज खऱ्या अर्थाने दिवाळी असून आम्ही उत्साहाने साजरी करणार आहे. आमच्यासाठी आज महत्त्वाचा दिवस आहे. आमचा सेनापती परत आला आहे. त्यामुळे आम्हा सर्व शिवसैनिकांमध्ये हजार हत्तीचे बळ संचारले आहे. आमच्यासाठी आनंदाचा क्षण आहे. 






संजय राऊत आमच्यासाठी आदर्श


संजय राऊतांच्या हिंमतीला दाद दिली पाहिजे. तुम्हाला जे करायचे ते करा, मी मरण पत्कारेल पण शरण पत्करणार नाही हा स्वाभिमानी बाणा जो संजय राऊतांनी दाखवला तो आमच्यासाठी आदर्श आहे. दुसरी गोष्ट म्हणजे जे चारही जण तुरूगांत आहे त्यांच्यासाठी देखील संजय राऊत एक आदर्श आहे. जर तुम्ही काही चूकीचे काम केले नसेल तर तुम्हाला घाबरण्याची गरज नाही, असेही सुषमा अंधारे म्हणाल्या. 


भांडुपमधील घराबाहेर शिवसैनिकांचा जल्लोष


 संजय राऊतांना जामीन मंजूर होणं, हा ठाकरे गटासाठी मोठा दिलासा असल्याचं बोललं जात आहे. अशातच संजय राऊत यांच्या भांडुपमधील घराबाहेर शिवसैनिकांचा जल्लोष पाहायला मिळत आहे. दुपारी तीन वाजता शिवसैनिकांकडून संजय राऊतांच्या घराबाहेर जल्लोष साजरा केला जाणार आहे. अशातच संजय राऊत यांच्या मातोश्रींनी एबीपी माझाला पहिली प्रतिक्रिया दिली आहे. "माझा मुलगा येतोय... आनंद आहे...", असं त्या म्हणाल्या आहेत. 


शिवसेना नेते खासदार संजय राऊत यांना पीएमएलए विशेष कोर्टाने जामीन मंजूर केल्यानंतर राऊत तुरुंगाबाहेर कधी येणार, याकडे अनेकांचे लक्ष लागले आहे. संजय राऊत यांच्या जामिनाला ईडीने विरोध केला असून स्थगिती देण्याची मागणी केली आहे. ईडी या जामिनाच्याविरोधात हायकोर्टात अपील करणार आहे. मात्र, सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, संजय राऊत आज संध्याकाळीच तुरुंगातून बाहेर येण्याची शक्यता आहे.


संबंधित बातम्या :


Sanjay Raut Bail : संजय राऊत निष्ठावंत शिवसैनिक, त्यांच्यावरही दबावतंत्र वापरलं पण गद्दारी केली नाही : आदित्य ठाकरे