Shiv Sena MP Sanjay Raut Press Conferance : पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे (Aaditya Thackeray) यांचा अयोध्या दौरा राजकीय नसेल, असं संजय राऊत (Sanjay Raut) यांनी स्पष्ट केलं आहे. त्यासोबतच 10 जून रोजी मोठ्या संख्येनं शिवसैनिक आणि युवासैनिक आदित्य ठाकरेंसोबत अयोध्येला जातील असंही राऊत म्हणाले आहेत. त्यासोबच अयोध्येत झळकलेल्या पोस्टर्सवरही राऊतांनी भाष्य केलं आहे. ठाकरे कधीही दबावाखाली काम करत नाहीत, तर ठाकरेंचाच दबाव असतो, असं संजय राऊत म्हणाले आहेत.
राज ठाकरेंच्या अयोध्या दौऱ्यानंतर आदित्य ठाकरे अयोध्या दौऱ्यावर जाणार असल्याची माहिती मिळत आहे. 10 जून रोजी अयोध्येला जातील अशी माहिती संजय राऊत यांनी दिली आहे. आदित्य ठाकरे यांच्या अयोध्या दौऱ्याचा मुहूर्त 10 जूनचा ठरला असून त्यांच्या दौऱ्याची सगळी तयारी जवळपास पूर्ण झाल्याचंही संजय राऊत यांनी माध्यमांशी बोलताना सांगितलं आहे.
शिवसेना खासदार संजय राऊत म्हणाले आहेत की, "माहित नाही असली नही क्या है? कोणी पोस्टर्स लावलेत? पण मला फक्त एवढंच माहीत आहे की, अयोध्येत शिवसेनेच्या स्वागताची तयारी सुरु झाली आहे. जोरदार स्वागत होईल. अयोध्येत कोण जातंय, कोण येतंय? यानं फरक पडत नाही. तिथे सर्वांना जावंच लागेल. प्रभू श्रीराम सर्वांचेच दैवत आहेत. ते एखाद्या धर्मापुरते मर्यादित नाहीत. पण कोणी खोट्या भावनेनं, राजकीय भावनेनं जात असेल किंवा कोणाला कमी लेखण्यासाठी जात असेल, तर त्यांना प्रभू श्रीरामांचा आशीर्वाद नाही मिळणार. तिथे विरोध होताना दिसेल."
"मुख्यमंत्री होण्यापूर्वी आणि मुख्यमंत्री झाल्यानंतर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे अयोध्या दौऱ्यावर गेले होते. आता तुम्ही विचारताय आदित्य ठाकरे केव्हा जाणार? आदित्य ठाकरे 10 जून रोजी जाणार आहेत. 10 जूनची तारीख जवळपास निश्चित करण्यात आली आहे. आदित्य ठाकरेंसोबत केवळ महाराष्ट्रातून नाही, तर संपूर्ण देशभरातून शिवसैनिक, युवासैनिक सर्वजण अयोध्येत 10 जून रोजी उपस्थित राहतील.", असंही राऊतांनी सांगितलं. आदित्य ठाकरेंचा दौरा राजकीय नसून आम्ही प्रभू श्रीरामांवरील श्रद्धा आणि भक्तीपोटी अयोध्येत जात आहोत, असंही राऊतांनी यावेळी बोलताना सांगितलं.