Shiv Sena : "आम्ही केवळ ठाकरे सरकार म्हणायचे. परंतु, प्रत्यक्षात लाभ कोण घेत आहे? त्यामुळे ठाकरे सरकार नाही तर पवार सरकार म्हणायचं" असा टोला लगावत शिवसेना खासदार गजानान किर्तीकर यांनी आपल्याच सरकारवर टीका केली आहे.  


राज्यात महाविकास आघाडीचं सरकार सत्तेत आहे. शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे मुख्यमंत्रीपदावर आहेत. परंतु, असं असलं तरी निधी वाटपामध्ये दुजाभाव होत असल्यामुळे शिवसेना आमदारांनी आपली नाराजी बोलून दाखवली आहे. त्यानंतर आता किर्तीकर यांनी आपली नाराजी बोलून दाखवली आहे. त्यामुळे निधीवाटपावरून शिवसेनेतील नाराजी अद्यापही कायम असल्याचं पुन्हा एकदा दिसून आलं आहे. 


गजानन किर्तीकर हे रत्नागिरी जिल्ह्यातील दापोली तालुक्यातील शिर्दे गावी रस्त्याच्या डांबरीकरणाच्या कामाचे उद्घाटन करण्यासाठी आले होते. या कार्यक्रमासाठी शिवसेनेचे दापोलीतील आमदार योगेश कदम उपस्थित होते. डांबरीकरणाच्या कामाचे उद्घाटन झाल्यानंतर किर्तीकर यांनी उपस्थितांशी संवाद साधला. यावेळी त्यांनी शिवसेनेतील अंतर्गत गटबाजीवर आपली नाराजी व्यक्त केली. 


अंतर्गत भेदींचा मोठा त्रास होतो. परंतु, मी आपल्या पाठिशी असल्याचे किर्तीकर यांनी योगेश कदम यांना यावेळी सांगितले. दापोली-मंडणगड नगरपंचायत निवडणुकीवेळी कदम पिता-पुत्रांना बाजुला करत शिवसेनेचे माजी आमदार सुर्यकांत दळवी यांच्या खांद्यावर जबाबदारी देण्यात आली होती. शिवाय रामदास कदम यांच्या कथित ऑडीओ क्लिप देखील व्हायरल झाल्या होत्या. त्यानंतर आता किर्तीकर यांनी बोलून दाखवलेल्या नाराजीवरून राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आले आहे.   


कदम पिता-पुत्रांना नगरपंचायत निडणुकीतून बाजूला करण्यामागे परिवहन मंत्री अनिल परब यांचा हात असल्याची चर्चा त्यावेळी राजकीय वर्तुळात रंगली होती. त्यानंतर आता गजानान किर्तीकर यांची नाराजी समोर आली आहे. शिवाय त्यांनी योगेश कदम यांना आपण त्यांच्या पाठीशी उभा असल्याचे म्हटले आहे.  त्यामुळे किर्तीकरांचा रोख नेमका कोणाकडे होता? असा प्रश्न राजकीय वर्तुळातून उपस्थित होत आहे.  


महत्वाच्या बातम्या