Kolhapur By Election : कोल्हापूर उत्तर या मतदार संघाची पोटनुविडणूक नुकतीच जाहीर झाली होती. या पोटनिवडणूकीत शिवसेनेनं काँग्रेससाठी माघार घेतली. या निर्णयावरुन कोल्हापूरमधील शिवसैनिकात नाराजी असल्याचे समोर आले आहे. शिवसेना नेते राजेश क्षीरसागर यांनी रविवारी सायंकाळी सभा घेत आपली नाराजी व्यक्त केली. रविवारी संध्याकाळी राजेश क्षीरसागर यांच्या घरासमोर शिवसैनिकांची गर्दी जमली होती. यावेळ बोलताना राजेश क्षीरसागर यांनी आपल्या मनातील सल बोलून दाखवली.
ज्या काँग्रेसने शिवसेनेचे पाच आमदार पाडले, त्या पक्षाला जागा सोडणे हे दुःखाचं वाटतं, असे वक्तव्य कोल्हापुरातील शिवसेना नेते राजेश क्षीरसागर यांनी केले आहे. विधानसभेत माझा खोट्या पद्धतीने माझा पराभव केला. पण मी थांबलो नाही काम करत राहिलो. उद्धव ठाकरे, आदित्य ठाकरे, एकनाथ शिंदे यांच्या साहाय्याने कोट्यवधी निधी आणला, असे क्षीरसागर म्हणाले. माझ्या हातातून मोठं काम होणार म्हणून ही पोटनिवडणूक लढवावी अशी जनतेची इच्छा होती. शिवसेनेने ही निवडणूक लढवावी असं पक्षातील सर्व पदाधिकाऱ्यांनी मागणी केली होती, असेही क्षीरसागर म्हणाले.
दरम्यान, काँग्रेसचे आमदार चंद्रकांत जाधव यांच्या निधनानंतर कोल्हापूर उत्तरची ही जागा रिक्त झाली होती. कोल्हापूर उत्तरची पोटनिवडणूक कधी जाहीर होणार याकडे सर्वच राजकीय पक्षांचे लक्ष लागले होते. अखेर 12 एप्रिल रोजी मतदान होणार असून 16 एप्रिलला मतमोजणी होणार आहे. शिवसेनेनं माघार घेतल्यामुळे आता येथे भाजप विरुद्ध काँग्रेस अशी सरळ लढत होणार आहे. आप पक्षानेही येथे आपला उमेदवार दिला आहे. आगामी कोल्हापूर पोटनिवडणुकीत करूणा शर्मा या शिव शक्तीकडून लढणार आहेत.
जयश्री जाधव यांनी भाजपकडून लढण्यास नकार दिला -
चंद्रकांत जाधव यांच्या निधनानंतर सांत्वन करण्यासाठी गेलेल्या भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांतदादा पाटील यांनी जयश्री जाधव यांना भाजपकडून पोटनिवडणूक लढवण्याची विनंती केली होती. मात्र त्यांनी स्पष्टपणे नकार दिला होता. जयश्री जाधव या भाजपच्या नगरसेविका होत्या. त्यामुळे त्यांनी भाजपच्या तिकिटावर पोटनिवडणूक लढावी अशी इच्छा चंद्रकांतदादा यांनी व्यक्त केली होती. मात्र त्यांनी भाजपकडून निवडणूक लढण्यास नकार दिला. त्यामुळे शिवसेना जर रिंगणात उतरणार असेल तर महाविकास आघाडीतील दोन पक्ष आणि भाजप अशी तिरंगी लढत होऊ शकते.
पोटनिवडणुकीचा सविस्तर कार्यक्रम
उमेदवारी अर्ज दाखल करण्याची तारीख 17 मार्च
उमेदवारी अर्ज दाखल करण्याची अंतिम तारीख 24 मार्च
अर्जांची छाननी 25 मार्च
अर्ज मागे घेण्याची अंतिम तारीख 28 मार्च
मतदान 12 एप्रिल आणि मतमोजणी 16 एप्रिलला होणार