मुंबई : नऊ तासांच्या चौकशीनंतर शिवसेना नेते खासदार संजय राऊत ( ED Detain Sanjay Raut  ) यांना ईडीने ताब्यात घेतले आहे. त्यानंतर शिवसेना खासदार अरविंद सावंत यांनी यावर प्रतिक्रिया दिली आहे. ईडी ही केंद्र सरकारची गुलाम आहे, अशी टीका अरविंद सावंत यांनी केली आहे. 


संजय राऊत यांना नऊ तासांच्या चौकशीनंतर ईडीने ताब्यात घेतले आहे. संजय राऊत यांना ईडी कार्यालयात नेण्यात येणार असून तिथे अटकेची कारवाई करण्यात येणार असल्याची दाट शक्यता आहे. आज सकाळी सात वाजण्याच्या सुमारास संजय राऊत यांच्या घरी ईडीच्या पथकाने छापा मारला होता. तेव्हापासून संजय राऊत यांची चौकशी सुरू होती. अखेर दुपारी चार वाजण्याच्या सुमारास राऊत यांना ईडीने ताब्यात घेतले. त्यानंतर अरविंद सावंत यांनी माध्यमांसोबत संवाद साधला.  


"ती ईडी नाही तर केंद्र सरकारची गुलाम आहे. विरोधकांना ठरवून टार्गेट केलं जात आहे. राज्यपालांच्या वादग्रस्त वक्तव्यामुळे सध्या संपूर्ण महाराष्ट्र पेटून उठला आहे. कालपासून राज्यात त्यांच्या विरोधात आंदोलने केली जात आहेत. या प्रकरणावरून लक्ष हटवण्यासाठी आज संजय राऊत यांच्यावर कारवाई करण्यात आली, असा आरोप अरविंद सावंत यांनी केला आहे.  


"ज्यांच्यावर भ्रष्टाचाराचे आरोप झाले ते भाजपमध्ये गेले की, स्वच्छ होतात. त्यामुळे जनतेला या कारवाया कशासाठी केल्या जात आहेत हे माहित आहे. कालच अर्जुन खोतकर ज्या पद्धतीने बोलले आहेत, त्याचवेळी त्यांनी स्पष्ट केले आहे की, ईडी कुटुंबाला त्रास देत आहे.  त्यामुळे भाजपात जावे लागत असल्याचे त्यांनी म्हटले. शिवाय या पूर्वी देखील हर्षवर्धन पाटील यांनी सांगितले होते की, भाजपमध्ये आल्यानंतर आता शांत झोप लागते. आता ईडीची कोणत्याही प्रकारची भीती नाही. भाजपचे हे काम लोकशाहीच्या मुळावर येणारी गोष्ट आहे, अशी टीका अरविंद सावंत यांनी केली आहे.  


महत्वाच्या बातम्या


ED Detain Sanjay Raut : संजय राऊत ईडीच्या ताब्यात, 9 तासांच्या चौकशीनंतर कारवाई  


Sanjay Raut : संजय राऊत यांना अटक होण्याची शक्यता - उद्धव ठाकरे