Shivsena : शिवसेना कशाचीही मार्केटिंग करत नाही असे म्हणत शिवसेना खासदार अनिल देसाई यांनी भाजपला टोला लगावला आहे. शिवसंपर्क अभियानाच्या निमित्ताने खासदार अनिल देसाई नांदेड येथे आले होते. यावेळी त्यांनी दिवंगत शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांना जनाब असे संबोधणारे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्यावरही देसाई यांनी टीका केली. 


खासदार अनिल देसाई यांनी म्हटले की, राजकारणासाठी शिवसेनेला हिंदुत्वाच्या कुबड्याची गरज नाही. आमची ओळख ही हिंदुत्व आहे. राजकारणासाठी हिंदुत्वाचा वापर करण्याची इतरांना गरज आहे. शिवसेनेला याची गरज नसून इतरांना त्याची गरज असल्याचे सांगत देसाई यांनी भाजपला टोला लगावला. 'द कश्मीर फाईल्स' हा चित्रपट पाहण्याची शिवसेनेला गरज नाही. बाळासाहेब ठाकरे यांनी कश्मीरी पंडितांसाठी व तेथील प्रत्येकासाठी मोठं काम केले आहे. निर्वासित म्हणून आलेल्या काश्मिरी पंडितांचे आदर अतिथ्य दाखवणारे शिवसेना प्रमुख बाळासाहेब होते याचीही आठवण त्यांनी यावेळी करून दिली. खासदार देसाई यांनी देवेंद्र फडणवीस यांच्यावरही टीका केली. इफ्तार पार्टीत बिर्याणीवर ताव मारणाऱ्याला 'जनाब'  म्हटले जाते, असेही देसाई यांनी म्हटले. 


भगवद्गगीता नव्हे इंधन दरवाढीवर बोला


सध्या भगवद्गगीतेपेक्षा पेट्रोल, डिझेलच्या वाढत्या किमती, महागाई, बेरोजगारी यावर भाष्य होणे आवश्यक आहे. हिजाब वादावरून त्यांनी म्हटले की, समाज पुढे जायला हवा. हिजाबवरून वादंग निर्माण करण्यामागे विरोधी पक्षाचा वेगळा हेतू आहे असेही त्यांनी म्हटले. शिवसेना कोणत्याही समाजाला विकासात मागे सोडणार नाही. पुरोगामी महाराष्ट्राला पहिल्या क्रमांकाचे राज्य बनवणार असल्याचे त्यांनी सांगितले. 


 


इतर महत्त्वाच्या बातम्या :



LIVE TV | मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज, महाराष्ट्रासह देश-विदेशातील प्रत्येक घडामोडी पाहा लाईव्ह - ABP Majha