मुंबई: कोविड-19 मुळे उद्भवलेल्या संसर्गजन्य परिस्थितीचा विचार करता या वर्षीचा ईद-ए-मिलाद (मिलादुन नबी) साध्यापणाने साजरा करावा असे राज्य सरकारने सर्व मुस्लिम बांधवांना आवाहन केले आहे. त्या संबंधीची मार्गदर्शक सूचना नुकतीच जाहीर करण्यात आली आहे.
राज्य सरकारने जारी केलेल्या परिपत्रकात असे म्हंटले आहे की कोरोनाची परिस्थिती असल्यामुळे इतर धार्मिक सणांप्रमाणे ईद-ए-मिलाद (मिलादुन नबी) घरात राहूनच साजरी करावी. राज्यात सर्व धार्मिक कार्यक्रमांना बंदी असल्यामुळे ईदच्या मिरवणूकीला परवानगी देण्यात येत नाही. परंतु प्रतिकात्मक स्वरुपात मुंबई येथील खिलाफत हाऊस येथे 10 लोकांसह एक ट्रकला परवानगी देण्यात येत आहे. या ठिकाणी होणाऱ्या कार्यक्रमाचे ऑनलाईन पध्दतीने आयोजन करावे. इतर प्रतिबंधित क्षेत्रात लागू करण्यात आलेले नियम तसेच राहतील. त्यात शिथीलता करण्यात येणार नाही.
ईद निमित्त मुस्लिम वस्तीत मोहंमद पैगंबर यांच्या स्मरणार्थ काही ठिकाणी सबील अर्थात तात्पुरत्या स्वरुपाची पाणपोई लावण्यात येते. त्यासाठी स्थानिक प्रशासनाची परवानगी घ्यावी लागेल. त्या ठिकाणी 5 पेक्षा जास्त लोकांना गर्दी करता येणार नाही. तसेच त्या ठिकाणी सोशल डिस्टन्सिंगचे पालन करावे लागेल.
ईद साजरी करताना कोणत्याही परिस्थितीत पाच पेक्षा जास्त लोकांनी एकत्र येऊन सण साजरा करू नये. कोरोनाची परिस्थिती लक्षात घेता रक्तदान शिबिरे, आरोग्य शिबिरे आयोजित करावी तसेच स्वच्छतेबाबत जागरुकता निर्माण करण्यासाठी प्रयत्न करावेत.
कोरोनाची परिस्थिती लक्षात घेता शासनाने आखलेल्या सर्व नियमांचे काटेकोरपणे पालन करावे लागेल. या नंतरच्या काळातही काही नवे नियम करण्यात आले तर त्याचेही पालन करावे लागेल असेही राज्य सरकारने त्यांच्या परिपत्रकात म्हंटले आहे. शासनाने काढलेले हे परिपत्रक शासनाच्या www.maharashtra.gov.in या संकेतस्थळावर उपलब्ध आहे.