Uday Samant attack In Pune : शिवसेनेचे बंडखोर आमदार उदय सामंत यांच्या ताफ्यावर मंगळवारी रात्री पुण्यातील कात्रज भागात हल्ला करण्यात आला होता. या प्रकरणावर राजकीय प्रतिक्रिया उमटत आहेत. याप्रकरणी शिवसेना आमदार वैभव नाईक यांनीही प्रतिक्रिया दिली आहे. उदय सामंत यांची गाडी आदित्य ठाकरे यांच्या सभेच्या ठिकाणी आली नसती तर ती दुर्घटना घडली नसती. राज्यातील आताच्या वातावरणामुळे शिवसैनिक पेटून उठलाय, मात्र कुणाची गाडी फोडण्याची भूमिका शिवसेनेची नाही, असे आमदार वैभव नाईक म्हणाले. 


संपूर्ण महाराष्ट्रातील शिवसैनिकांच्या डोळ्यांमध्ये अश्रू आणायचं काम यांनी केलं. त्यामुळेच महाराष्ट्रातील शिवसैनिक पेटून उठला आहे. परंतु शिवसैनिक पेटून उठला म्हणून कुणाची गाडी फोडण्याची भूमिका कुणाची नसेल. आमचा लोकशाही पद्धतीने उत्तर देण्याचा प्रयत्न आहे. त्यामुळेच आम्ही लोकांसमोर जात आहोत. गाड्या फोडण्याच्या भूमिकेला आदित्य ठाकरे यांचं ते समर्थन करत नाहीत. भाजपच्या माध्यमातून बंडखोरी केलेल्या आमदारांनी आता आमचा अंत पाहू नये, असे वैभव नाईक म्हणाले.  उदय सामंत यांनी लोकशाहीत अनेकवेळा आपले विचार बदलले आहेत. दुर्दैवाने उदय सामंत यांची गाडी आदित्य ठाकरे यांच्या सभेच्या ठिकाणी आली, म्हणून ती घटना घडली. उदय सामंत त्याठिकाणी आले नसते तर ती दुर्घटना घडली नसती, अशी प्रतिक्रिया आमदार वैभव नाईक यांनी दिली.
 
नितेश राणेंना सुनावले - 
निष्ठा यात्राच्या बरोबर “फटके” यात्रा काढणयाची वेळ आली आहे, असं ट्विट भाजपचे आमदार नितेश राणे यांनी केले. यावर शिवसेनेचे आमदार वैभव नाईक यांनी नितेश राणेंनी तसा प्रयत्न करावा म्हणजे शिवसेनेची काय ताकद आहे ती आम्ही दाखवून देऊ, असा इशारा दिला. मराठवाडा, कोकण, पश्चिम महाराष्ट्रात आदित्य ठाकरेंच्या निष्ठा यात्रेला चांगला प्रतिसाद मिळत असल्याने नितेश राणेंची ही भूमिका असल्याचं वैभव नाईक यांनी सांगितले.


आरोपींना 2 दिवसांची पोलीस कोठडी - 
उदय सामंत (Uday Samant) यांच्या कारवर झालेल्या हल्ल्यानंतर पुणे (Pune) पोलीसांनी आरोपींना 2 दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे. आरोपीवर 252,120, 307, 332 या कलमानुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे.  बबन थोरात, शहराध्यक्ष संजय मोरे यांच्यासह तीन आरोपींना पोलीस कोठडी सुनावली आहे. 


तर मुख्यमंत्र्यांवर हल्ला होऊ शकला असता - सामंत 
या भ्याड हल्ल्याबाबत मी फार बोलत नाही याचा अर्थ मी हतबल आहे असा नाही. माझ्या गाडीच्या मागे मुख्यमंत्र्यांची गाडी येण्याची शक्यता होती. त्या गाडीत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि शिंदे गटातील बंडखोर आमदार तानाजी सावंत देखील होते. मुख्यमंत्र्यांची गाडी थांबली असती तर त्यांच्यावर देखील हा हल्ला होऊ शकला असता, अशी प्रतिक्रिया उदय सामंत यांनी दिली आहे.