मुंबई : गेल्या काही दिवसांपासून हॉटेल रिट्रिटमध्ये असलेल्या शिवसेना आमदारांना स्वगृही परतण्याचे आदेश देण्यात आले आहे. काल (13 नोव्हेंबर)रात्री 9 वाजता आमदार एकनाथ शिंदे आणि आमदार रामदास कदम यांनी सर्व आमदारांना आपआपल्या मतदार संघात जाण्याचे उद्धव ठाकरेंचे आदेश असल्याची माहिती दिली. त्यानंतर सर्व आमदारांनी घरी जाण्याची तयारी सुरु केली.
विधानसभेचा निकाल लागल्यानंतर राज्यात सुरु झालेलं राजकीय नाट्य अजून सुरु आहे. मुख्यमंत्रीपदावर शिवसेनेने दावा केल्यामुळे भाजप-सेनेत बिनसलं. सत्तेसाठी आमदारांचा घोडेबाजार होऊ शकतो. यामुळं शिवसेनेने खबरदारीचा उपाय म्हणून आपल्या सर्व आमदारांना मुंबईत आधी रंगशारदा आणि आता हॉटेल रिट्रिटमध्ये ठेवले होते. सध्या महाशिवआघाडीची सत्तास्थापनेच्या दृष्टीने चर्चा सुरु असल्याने या सर्व आमदारांना घरी जाण्याचे आदेश देण्यात आले आहे. राज्यात सध्या ओला दुष्काळ सदृश परिस्थिती आहे. प्रत्येक आमदाराला मतदारसंघाचा आढावा घेता यावा यासाठी मतदार संघात जाण्याचे आदेश उद्धव ठाकरेंनी दिले आहे, अशी माहिती शिवसेनेच्या सुनील राऊत यांनी दिली.
शिवसेनेचा आमदार फोडायचा प्रयत्न केला तर त्याचं डोकं फुटेल -
शिवसेनेचा आमदार फोडण शक्य नाही. जर कोणी प्रयत्न केला तर त्याचं डोकं फुटेल, असा इशारा आमदार दिलीप लांडे यांनी दिला आहे. तर, सत्तास्थापनेसाठी राज्यपालांकडे जाण्यासाठी सर्व आमदार एकत्र असावेत ते लवकर पोहचावेत यासाठी त्यांना एकत्र मुंबईत ठेवण्यात आलं होतं. त्यासाठी आम्हीच विनंती केली असल्याचे लांडे म्हणाले. अमित शाह यांच्यासोबत ठेरलेला फॉर्म्युला उद्धव ठाकरेंना माहिती आहे. ते जो निर्णय घेतील तो आम्हाला मान्य असेल आणि पक्षप्रमुख ठरवतील तोच मुख्यमंत्री होईल. राष्ट्रपती राजवट हा केवळ बाऊ असून उद्धव ठाकरे ठरवतील त्यादिवशी मुख्यमंत्री होईल, असा विश्वास यावेळी त्यांनी व्यक्त केला.
आमदार अनिल परब काय म्हणाले?
राज्यपालांसमोर सर्व आमदार उपस्थित राहण्यासाठी सर्वांना एकत्र ठेवलं होतं. सध्या मतदार संघात अनेक प्रश्न आहेत. त्यामुळे सर्वांना घरी जाण्यास सांगण्यात आलं आहे. सत्तास्थापनेचं ज्या दिवशी ठरेल त्यादिवशी सर्वांना पुन्हा बोलावण्यात येईल. उद्धव ठाकरे ओला दुष्काळ असणाऱ्या भागाचा दौरा करणार आहेत. मध्यवर्ती निवडणुकांची केवळ चर्चा आहे, असं काही होणार नाही. अडीच अडीच वर्षाच्या फॉर्म्युल्याबाबत अमित शाह वारंवार बोलत आहेत. त्याचं उत्तर उद्धव ठाकरेंनी दिलं आहे. दरम्यान, 17 नोव्हेंबरला दिवंगत बाळासाहेब ठाकरे यांच्या पुण्यतिथीला सर्वजणांना हजर राहण्याचे सांगण्यात आले आहे.
शिवसेना आमदारांना मतदारसंघात परतण्याचे आदेश; आता सत्तास्थापनेलाच परत येणार
एबीपी माझा वेब टीम
Updated at:
14 Nov 2019 07:16 AM (IST)
गेल्या काही दिवसांपासून मुंबईत अडकून पडलेल्या शिवसेना आमदारांना अखेर स्वगृही परतण्याचे आदेश देण्यात आले आहे. 17 नोव्हेंबरला दिवंगत बाळासाहेब ठाकरे यांच्या पुण्यातिथीला हजर राहण्याचे त्यांना सांगण्यात आले आहे.
- - - - - - - - - Advertisement - - - - - - - - -