मुंबई : शरद पवारांच्या निवासस्थानी झालेल्या हायहोल्टेज ड्राम्यानंतर सत्तास्थापनेसाठी काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसमधील बैठक पार पडली. या बैठकीला राष्ट्रवादीचे नेते अजित पवार यांच्यासह काँग्रेस-राष्ट्रवादीचे प्रमुख नेते उपस्थित होते. हॉटेल ट्रायडेंटमध्ये ही बैठक झाली. दरम्यान अद्याप ही बैठक सुरु आहे. दरम्यान या बैठकीबाबत कमालीची गुप्तता पाळली गेली होती. दरम्यान, अजूनही आमच्यामध्ये चर्चा सुरू आहे. आज एक दीड तास आम्ही नेत्यांनी मिळून चर्चा केली. आमची भूमिका लवकरच समोर मांडू. उद्या पण आम्ही एकत्र येण्याचं ठरवू, असे बैठकीनंतर जयंत पाटील यांनी म्हटले आहे.

बैठकीला राष्ट्रवादीचे अजित पवार, जयंत पाटील, छगन भुजबळ, नवाब मलिक, धनंजय मुंडे हे नेते उपस्थित होते तर काँग्रेसचे बाळासाहेब थोरात, सुशीलकुमार शिंदे, अशोक चव्हाण, पृथ्वीराज चव्हाण, विजय वडेट्टीवार हे नेते उपस्थित होते.

दरम्यान या बैठकीआधी मोठा ड्रामा पाहायला मिळाला. सत्तास्थापनेच्या पार्श्वभूमीवर काँग्रेस-राष्ट्रवादीमध्ये होणारी समन्वय समितीची बैठक रद्द झाल्याची माहिती राष्ट्रवादीचे नेते अजित पवार यांनी दिली. अजित पवार तडकाफडकी बैठकीतून बाहेर पडले. तसेच आपण बारामतीकडे निघालो आहोत असे त्यांनी माध्यम प्रतिनिधींना सांगितले. बैठकीतून बाहेर पडल्यानंतर माध्यमांनी त्यांना प्रतिक्रियेसाठी घेरल्यानंतर बैठक रद्द झाली असल्याचे त्यांनी सांगितले. तसेच नंतर बैठक कधी होईल हे आपण सांगू शकत नाही असेही अजित पवार म्हणाले. तर कॉंग्रेसची बैठक संपली आहे. यात प्राथमिक चर्चा झाली आहे. आता राष्ट्रवादीचा निरोप आल्यावर बैठकीला जाऊ, असे कॉंग्रेसचे नेते अशोक चव्हाण यांनी सांगितले. आज चर्चा झाली नसली तरी उद्या चर्चा होईल, असे ते म्हणाले होते.

तर राष्ट्रवादीचे नेते अजित पवार मुंबईतच आहेत. अजित पवार राष्ट्रवादीच्या बैठकीसाठी हजर आहेत. उद्या सकाळी अजित पवार तुम्हाला भेटतील, असे राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी सांगितले होते. अजित पवारांनी चेष्टेने एखादी गोष्ट सांगितली, तरी तुमच्या गाड्या त्यांच्या मागे लागतात. त्यामुळे त्यांची प्रायव्हसी जाते. त्यामुळे अजित पवारांनी मी बारामतीला जातोय असं सांगितलं, असंही शरद पवार म्हणाले होते.