मुंबई : शिवसेना आमदार अपात्रतेची सुनावणी (Shivsena MLA Disqualification) सुरू झाली आहे. मंगळवारपासून शिवसेना ठाकरे गटाचे नेते आणि प्रतोद सुनील प्रभू (Sunil Prabhu) यांची उलट तपासणी सुरू आहे. आजही ही त्यांचीच उलट तपासणी शिंदे गटाचे वकील अॅड. महेश जेठमलानी करत आहेत. प्रभू यांच्या उलट तपासणीसाठी लागत असलेल्या वेळेवरून विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी नाराजी व्यक्त केली आहे. माझ्या हाती फक्त 16 दिवस असून यात सुनावणी पूर्ण करून निकाल लावायचे असल्याचे सांगितले.
आमदार अपात्रता सुनावणीत आज ठाकरे गटाचे प्रतोद सुनील प्रभू (Sunil Prabhu) यांच्या उलट तपासणीला सुरुवात झाली. सुनावणीत साक्षीसाठी काय रेकॉर्डवर घेतलं जात आहे हे दिसण्यासाठी नवीन स्क्रीन लावण्यात आली आहे. सुनील प्रभू यांना विविध मुद्द्यांवर घेरण्याचा प्रयत्न काल शिंदे गटाचे वकील महेश जेठमलानी (Mahesh Jethmalani) यांनी केला. इंग्रजी भाषेतील याचिकेवरून झालेल्या वादानंतर आज भाषांतर करण्यासाठी नियुक्ती करण्यात आली आहे. आज व्हीपच्या मुद्द्यावरून सुनील प्रभूंना जेठमलानी यांनी घेरले आहे. 21 जूनला प्रभूंनी बजावलेल्या व्हीपवरून प्रभूंना सवाल केला.
शिंदे गटाचे वकील अॅड. जेठमलानी संतापले
या उलट तपासणीत अॅड. जेठमलानी यांनी सुनील प्रभू यांना व्हीप कधी जारी केला, कोणाला जारी केला, कोणते आमदार मिसिंग होते आदी प्रश्नांची सरबत्ती केली. त्यावर प्रभू यांनी उत्तर दिले. मी ज्यांना हातोहात व्हीप द्यायला लावले जे मुंबईत उपस्थित होते. ज्यांचे फोन लागत नव्हते ते मिसिंग होते. त्यांना व्हीप पाठविणे आवश्यक होते रात्रीपासून ते बैठकीपर्यत मी व्हीप देण्याचा प्रयत्न करत होतो, असे प्रभू यांनी एका प्रश्नाच्या उत्तरात म्हटले. त्यानंतर विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी अॅड. कामत आपले आमदार खूप मोठे उत्तर देत आहेत ज्याचा मूळ प्रश्नांशी संबंध येत नाही त्यांनी जर स्पेसिफिक उत्तर दिली तर वेळ जास्त लागणार नाही अशी सूचना केली. त्यावर प्रभू यांनी जर मला समोरचे वकील इतके उपप्रश्न विचारात असतील तर मला संक्षिप्त उत्तरे द्यावे लागतील त्यामुळे यातून मला संरक्षण द्या ! त्यांनी एवढे उपप्रश्न केले आहेत त्यामुळे मला असे उत्तर द्यावी लागणार असे म्हटले. यावर अॅड. जेठमलानी संतापले. मी त्यांना एवढंच विचारतोय की मिसिंग आमदार कोण होते ? तर ते उत्तर फिरून देताय ...मला मिसिंग आमदारांची नावे सांगा, असे जेठमलानी यांनी सांगितले.
विधानसभा अध्यक्षांची नाराजी
ज्या गतीने सुनावणी सुरू आहे त्यावर विधानसभा अध्यक्षांची नाराजी व्यक्त केली आहे. फक्त 16 दिवस माझ्याकडे या सुनावणी साठी आहे त्यात हे प्रकरणाची सुनावणी संपवून निर्णय घ्यायचा आहे, असे विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी म्हटले. नार्वेकर यांनी म्हटले की, मला 31 डिसेंबरपर्यंत या प्रकरणांची सुनावणी संपवायची आहे. सार्वजनिक सुट्ट्या आणि अधिवेशन कालावधी वगळता माझ्याकडे या प्रकरणाची सुनावणी पूर्ण करण्याकरिता फक्त 16 दिवसाचा कालावधी आहे असल्याचे त्यांनी दोन्ही पक्षकारांना सांगितले. ज्या गतीने जर सुनावणी जात असेल तर हे सगळं प्रकरणाची सुनावणी पूर्ण करणे अवघड होईल, असेही त्यांनी म्हटले.