Shiv Sena MLA Disqualification Case: विधानसभा अध्यक्षांसमोर (Assembly Speaker) शिवसेना (Shiv Sena) आमदारांच्या पात्र-अपात्रते संदर्भातील सुनावणी उद्यापासून सुरू होणार आहे. या सुनावणीला कसं सामोरं जायचं याचं नियोजन ठाकरे गटानं (Thackeray Group) केलं आहे. ठाकरे गटाकडून त्यांचे दोन वकीलच आमदारांची बाजू अध्यक्षांसमोर मांडणार आहेत. विधानसभा अध्यक्षांकडून वैयक्तिकरित्या आमदारांना आपलं म्हणणं मांडा, असं सांगितलं तरंच आमदार स्वतः आपली भूमिका मांडतील, अन्यथा ठाकरे गटाचे वकीलच सर्व आमदारांची बाजू मांडणार आहेत.
शिवसेनेतील प्रबळ नेते एकनाथ शिंदेंनी काही आमदारांसह बंड केलं आणि शिवसेनेत उभी फूट पडली. एकनाथ शिंदेंचा शिंदे गट आणि उद्धव ठाकरेंचा ठाकरे गट असे दोन गट पडले. तेव्हापासूनच राज्यानं अभूतपूर्व सत्तासंघर्ष अनुभवला. तेव्हापासूनच आमदारांच्या पात्र-अपात्रतेचा निर्णय ऐरणीवर होता. तसेच, महाराष्ट्राच्या सत्तासंघर्षाच्या सुनावणी दरम्यान, सर्वोच्च न्यायालयानंही आमदार अपात्रतेचा निर्णय विधानसभा अध्यक्ष घेतील, असं सांगितलं होतं. अखेर उद्यापासून विधानसभा अध्यक्षांसमोर या प्रकरणाच्या सुनावणीला सुरुवात होणार आहे. या सुनावणीसाठी ठाकरे गटानं आपली रणनिती ठरवली आहे.
विधानसभा अध्यक्षांसमोर शिवसेना आमदारांच्या पात्र-अपात्रते संदर्भातील सुनावणीला समोर जाताना ठाकरे गटानं रणनिती ठरवली आहे. शिवसेना ठाकरे गटाच्या सर्व आमदारांनी वकील पत्र अध्यक्षांकडे सादर केलं आहे. ज्यामध्ये दोन पानी आपलं लेखी म्हणणं वकिलांच्या मार्फत मांडण्यात आलं आहे. सर्वोच्च न्यायालयाचे ज्येष्ठ वकील देवदत्त कामत आणि वकील असीम सरोदे यांच्यामार्फत वकीलपत्र ठाकरे गटाकडून सादर करण्यात आलं आहे, हे वकील सुनावणी दरम्यान ठाकरे गटाच्या आमदारांची बाजू मांडणार असल्याची माहिती मिळत आहे. दरम्यान, याआधी ठाकरे गटाच्या आमदारांनी अध्यक्षांनी दिलेल्या नोटिशीला वकिलांमार्फत वैयक्तिकरित्या 500 पानी लेखी उत्तर दाखल केलं होतं. अगदी तशाच प्रकारे सुनावणी दरम्यान ठाकरे गटाच्या 14 आमदारांनी वकील पत्रात आपलं लेखी म्हणणं अध्यक्षांकडे सादर केलं आहे
उद्या सकाळी 11 वाजता विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांच्या कार्यालयात ठाकरे गटाच्या आमदारांची पुन्हा एक बैठक होईल आणि त्यानंतर बारा वाजता ठाकरे गटाचे सर्व आमदार आणि वकील सुनावणीसाठी उपस्थित राहतील, असं सांगितलं जात आहे. यामध्ये सुनावणी दरम्यान ठाकरे गटाकडून त्यांचे दोन वकीलच आमदारांची बाजू अध्यक्षांसमोर मांडतील, असंही सांगण्यात आलं आहे. अध्यक्षांकडून वैयक्तिकरित्या आमदारांना सुनावणी दरम्यान आपलं म्हणणं मांडण्यास विचारलं गेल्यास आमदार आपली भूमिका मांडतील, असंही सांगण्याता आलं आहे.
महत्त्वाच्या इतर बातम्या :