Shiv Sena MLA Disqualification Case: मुंबई : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (CM Eknath Shinde) यांच्यासह 16 आमदारांच्या अपात्रतेचा (MLA Disqualification Case) निकाल तयार झाल्याची चर्चा आहे. विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर (Vidhan Sabha Speaker Rahul Narwekar) यांनी त्यांच्या निकालपत्राचा मसुदा कायदेशीर अभिप्रायासाठी दिल्लीतील तज्ज्ञांकडे पाठवल्याचं समजतं. दरम्यान सर्वोच्च न्यायालयाच्या निर्देशानुसार 10 जानेवारीपर्यंत निकाल देणं अनिवार्य आहे. 


सर्वोच्च न्यायालयानं विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकरांना शिवसेना आमदार अपात्रता प्रकरणी 10 जानेवारीपर्यंत निकाल जाहीर करण्याचे निर्देश दिले आहेत. त्यामुळे विधानसभा अध्यक्ष 10 जानेवारीपर्यंत वाट न पाहाता, आज किंवा उद्यापर्यंतच निकाल जाहीर करू शकतात, अशा चर्चा राजकीय वर्तुळात सुरू आहेत. 'लोकसत्ता'नं दिलेल्या वृत्तानुसार, शिवसेना आमदार अपात्रता प्रकरणाचा निकाल तयार असून विधानसभा अध्यक्षांनी ही निकालाचा मसुदा दिल्लीला कायदेशीर अभिप्रायासाठी तज्ज्ञांकडे पाठवला आहे. 


अध्यक्षांचा निकाल काय? निवडणूक आयोगाप्रमाणेच शिंदेंनाच झुकतं माप? 


याबाबत जर स्पष्टीकरण द्यायचं झालं तर, निवडणूक आयोगानं ज्या ट्रिपल टेस्टच्या आधारावर शिंदेंना झुकतं माप देत पक्ष आणि चिन्ह बहाल केलं, त्याचाच जर आधार विधानसभा अध्यक्षांनी घेतला, तर निकाल काय असू शकतो, याचा अंदाज आपल्या सर्वांना लावता येईलच. देशाच्या इतिहासात पहिल्यांदाच विधानसभा अध्यक्षांना याबाबत निर्णय घ्यायचा आहे. ज्यावेळी शिवसेनेत फूट पडली त्यावेळी राजकीय पक्ष कोणाचा होता? जर त्यादिवशी राजकीय पक्ष एकनाथ शिंदेंचा होता, तर मग राजकीय पक्ष आणि विधीमंडळ पक्ष अशी जी विभागणी सर्वोच्च न्यायालयानं आपल्या निकालात केली आहे, त्याचा नेमका अर्थ काय? याचा सारासार विचार करुन अन्वयार्थ लावणारा हा देशाच्या इतिहासातील ऐतिहासिक निवाडा असणार आहे. विधानसभा अध्यक्षांनीही स्वतः अनेकदा हा निवाडा ऐतिहासिक असल्याचं म्हटलं आहे. 


दरम्यान, पुढच्या दोनच दिवसांत हे स्पष्ट होणार आहे की, मुख्यमंत्रीपदी विराजमान असलेले एकनाथ शिंदे आणि त्यांचे 16 आमदार अपात्र ठरतील का? आणि जर ते अपात्र झाले, तर राज्य सरकारचं अस्तित्व संपुष्टात येईल, अशी शक्यता वर्तवली जात आहे. एकनाथ शिंदे जर पात्र ठरले तर उद्धव ठाकरे गटातील आमदार अपात्र ठरतील का? किंवा यापेक्षा वेगळा निकाल लागेल का? अशा अनेक शक्यता राजकीय वर्तुळात चर्चेत आहेत. 


राहुल नार्वेकर-मुख्यमंत्री शिंदे यांच्यात चर्चा


विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यात रविवारी (7 जानेवारी 2024) वर्षा बंगल्यावर चर्चा झाली. दोघांच्या भेटीचं कारण अद्याप गुलदस्त्यात आहे, मात्र 10 जानेवारीला नार्वेकर आमदार अपात्रतेप्रकरणी निकाल देणार असल्यानं चर्चांना उधाण आलं आहे.


राष्ट्रवादीच्या दोन्ही गटांना नोटीस


आमदार अपात्रताप्रकरणी राष्ट्रवादीच्या दोन्ही गटांना विधिमंडळ सचिवालयाकडून नोटीस धाडण्यात आली आहे. दोन्ही गटाकडून कागदपत्रंही दाखल करण्यात आली आहेत. एकमेकांविरोधात केलेले आरोप प्रत्यारोप खोडण्याची संधी दोन्ही गटांना सुनावणी दरम्यान मिळणार आहे.


पाहा व्हिडीओ : Shivsena 16 MLA Disqualification Case : शिवसेना आमदार अपात्रता प्रकरणाचा निकाल तयार? : ABP Majha



महत्त्वाच्या इतर बातम्या : 


Lok Sabha Election 2024 : जागावाटपाआधीच महाविकास आघाडीतील धुसफूस चव्हाट्यावर; दक्षिण मुंबईसाठीही काँग्रेस आग्रही, ठाकरेंसमोर पेच?