मुंबई : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांच्यासह 16 आममदारांच्या अपात्रेचा निकाल तयार झाला आहे. 10 तारखेला 4 वाजता निकाल जाहीर करण्याची शक्यता आहे. याच निकालावर दिल्लीतील तज्ज्ञांकडून अभिप्राय मागवण्यात आले आहेत अशी माहिती आहे. विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर (Rahul Narvekar) त्यांच्या निकालपत्राचा मसुदा कायदेशीर अभिप्रायासाठी दिल्लीतील कायदेतज्ज्ञांकडे पाठविला असल्याची माहिती देखील मिळतेय. निवडणूक आयोगाने शिवसेनेतील (Shiv Sena) वादात शिंदे गटाच्या बाजूले कौल दिला होता. निवडणूक आयोगाच्या आदेशाचाही आधार घेण्यात आल्याचे कळतंय.  


शिवसेनेत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासह त्यांचे 40 आमदार अपात्र ठरणार की उद्धव ठाकरे यांच्या गटातील 14 आमदार अपात्र ठरणार याचा निकाल येत्या दोन दिवसांत होणार आहे. विधानसभेचे अध्यक्ष राहुल नार्वेकर यांच्याकडे एकूण 34 याचिका दाखल करण्यात आल्या होत्या. यावर 14 सप्टेंबर ते 20 डिसेंबर सुनावणी सुरू होती. त्या आधी निवडणूक आयोगाने शिवसेनेतील फुटीत पक्षाचे नाव आणि चिन्ह हे शिंदे गटाकडे सुपूर्द करून शिंदे यांचीच शिवसेना अधिकृत असल्याचे कौल दिला होता.


शिंदे गटाने शिवसेनेत फूट पडलेलीच नाही, असा युक्तिवाद करून शिवसेनेत आम्ही नेतृत्व बदल केल्याचा दावा केला आहे. शिवसेनेच्या दोन्ही गटांची एकमेकांच्या विरोधात पक्षांतर बंदी कायद्यानुसार पक्षाच्या शिस्तीचा भंग केल्याची कारवाई करा अशी मागणी आहे. तसे झाले तर आमदाराची विधिमंडळ सदस्यत्वता धोक्यात येईल. 


नेमकं काय होऊ शकतं?


 निकाल क्रमांक 1


शिवसेनेच्या ठाकरे गटाचे प्रतोद सुनील प्रभू यांनी बजावलेला व्हिप मान्य करण्यात आला नाही किंवा त्याचे उल्लंघन करण्यात आले असे सिद्ध झाल्यास मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासह त्यांच्या गटातील 40 आमदार अपात्र ठरू शकतात.


 निकाल क्रमांक 2 


शिवसेना पक्षाचं नाव आणि चिन्ह केंद्रीय निवडणूक आयोगाने एकनाथ शिंदे यांच्या पक्षाला दिलं आहे. तसाच निवाडा राहुल नार्वेकर देतील. पक्षात फूट पडली त्यावेळी विधीमंडळ प्रमाणे मुळ राजकीय पक्षही शिंदेंचाच असा निवाडा येवू शकतो. ठाकरे गट अपात्र ठरेल 


 निकाल क्रमांक 3


 राहुल नार्वेकर तटस्थ निकाल देतील. दोन्हीपैकी कोणत्याही एका गटाला अपात्र ठरवणार नाहीत. हे प्रकरण पुन्हा सर्वोच्च न्यायालयाकडे वर्ग करू शकतील अशीही शक्यता वर्तवली जात आहे. 


 निकाल क्रमांक 4


 गेल्या काही दिवसांपासून राहुल नार्वेकर अध्यक्ष पदाचा राजीनामा देऊ शकतात अशी चर्चा राजकीय वर्तुळात सुरू आहे. तसंच अध्यक्ष पदाचा राजीनामा देत ते दक्षिण मुंबई मतदारसंघातून लोकसभा निवडणुकीला उभं राहणार असल्याचीही चर्चा सुरू आहे. 


 मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासह १६ आममदारांच्या अपात्रेचा निकाल तयार झाला आहे. 10 तारखेला 4 वाजता निकाल जाहीर होण्याची शक्यता आहे. येणार निकाल महाराष्ट्राच्याच नव्हे देशाच्या इतिहासांत महत्त्वाचा ठरणार आहे. त्यामुळे आता प्रश्न असा निर्माण झालाय की नेमका हा कौल कुणाच्या बाजूने लागणार. तसेच या निकालावर राज्याचं राजकारणाचं भविष्य देखील ठरणार असल्याचं म्हटलं जात आहे. 


हेही वाचा :


MLA Disqualification: आमदार अपात्रता निकालासाठी उरले 49 तास, राहुल नार्वेकरांकडे काय आणि किती पर्याय?