Maharashtra Political Crisis : शिवसेनेच्या (Shiv Sena) 40 आमदार आणि ठाकरे गटाच्या (Thackeray Group) 14 आमदारांना अपात्रतेसंदर्भात म्हणणं मांडण्यासाठी विधानसभा अध्यक्षांकडून नोटीस बजावण्यात आली आहे. अपात्रतेविरोधातील कारवाई टाळण्यासाठी आमदारांना सर्व पुरावे सादर करावे लागणार आहेत. शिवसेनेच्या घटनेचा अभ्यास करुन विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर (Rahul Narvekar) लवकरच निर्णय घेण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. विधीमंडळाकडून नोटीस जारी करताना आमदारांना म्हणणं मांडण्यासाठी सात दिवसांची मुदत देण्यात आली आहे. दरम्यान, आमदारांच्या अपात्रता प्रकरणाबद्दल विधानसभा अध्यक्षांनी शिवसेना आणि ठाकरे गटाच्या सर्व आमदारांना नोटीस म्हणून जे पत्र धाडलं होतं, ते एबीपी माझाच्या हाती लागलं आहे. 


आमदारांच्या अपात्रता प्रकरणाबद्दल विधानसभा अध्यक्षांनी शिवसेना आणि ठाकरे गटाच्या सर्व आमदारांना नोटीस पाठवली होती. हे पत्र एबीपी माझाच्या हाती लागलं आहे. अपात्रतेच्या मुद्द्यावर आपली भूमिका सात दिवसांत कळवण्याचे निर्देश या पत्रात विधानसभा अध्यक्षांकडून दोन्ही गटांना देण्यात आले आहेत.


शिवसेनेच्या (शिंदे गट) सर्व आमदारांची आज याचसंदर्भात महत्त्वाची बैठक पार पडली. या बैठकीत शिवसेनेकडून या नोटीसला उत्तर देण्यासाठी वाढीव वेळ मागितला जाण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. दरम्यान, 14 आमदारांच्या अपात्रतेसंदर्भातील निर्णयासंदर्भात प्रक्रिया सुरू असून विधानसभा अध्यक्ष लवकरच याप्रकरणी निर्णय देणार आहेत.  


पत्रात काय म्हटलंय? 


प्रस्तुत पत्र आपणांस प्राप्त झाल्याच्या दिनांकापासून सात दिवसांच्या आत आपले लेखी अभिप्राय सादर करण्याबाबत कळवण्यात आले होते. दरम्यान, अद्याप आपणांकडून या प्रकरणी लेखी अभिप्राय प्राप्त झालेले नाहीत. यासंदर्भात पारस्पारिक संबंध असलेल्या अन्य निरर्हता अर्जाच्या अनुषंगाने मा. सर्वोच्च न्यायालयात याचिकांद्वारे काही घटनात्मक मुद्दे उपस्थित करण्यात आले होते. दिनांक 11 मे 2023 रोजी मा. सर्वोच्च न्यायालयाने उक्त याचिकांवर अंतिम निकाल दिला असून त्यामध्ये न्यायालयाने प्रस्तुत प्रकरणी भारतीय राज्यघटनेच्या दहाव्या अनुसूची अंतर्गत महाराष्ट्र विधानसभा अध्यक्षांनी निर्णय घेण्याबाबत अभिप्राय नोंदविले आहेत.


उपरोक्त पार्श्वभूमीवर आपणांस आता पुनश्च याद्वारे कळविण्यात येते की, आपण प्रस्तुत निरर्हता अर्जावर आपले लेखी अभिप्राय, योग्य त्या कागदपत्रांसह, हे पत्र प्राप्त झाल्याच्या दिनांकापासून सात दिवसांच्या आत महाराष्ट्र विधानसभा अध्यक्षांकडे सादर करावेत. उक्त मुदतीत उपरोक्तप्रमाणे आपण आपले लेखी अभिप्राय सादर न केल्यास आपणांस या अर्जाबाबत काहीही म्हणावयाचे नाही असे समजून सदरहू अर्जावर निर्णय घेण्यात येईल. तरी आपण आपले लेखी अभिप्राय विहित मुदतीत मा. अध्यक्ष, महाराष्ट्र विधानसभा यांचेकडे सादर करावेत.


विधानसभा अध्यक्ष काय म्हणाले होते?


महाराष्ट्रात राजकीय उलथापालथ (Maharashtra Political Crisis) सुरु असतानाच विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांचं महत्त्वाचं वक्तव्य समोर आलं होत. केंद्रीय निवडणूक आयोगाकडून शिवसेनेच्या घटनेची प्रत आपल्याला मिळाली असून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासह 16 शिवसेना आमदारांविरुद्धच्या अपात्रतेच्या याचिकांवर लवकरच सुनावणी सुरु होणार आहे, असं राहुल नार्वेकर यांनी शुक्रवारी (7 जुलै) सांगितलं होतं. राहुल नार्वेकर यांनी निवडणूक आयोगाकडे शिवसेनेच्या घटनेची प्रत मागितली होती. ही प्रत त्यांच्या कार्यालयाला मागील आठवड्यात मिळाली आहे. आता आम्ही सुनावणी सुरु करु, असं राहुल नार्वेकर यांनी म्हटलं आहे. ही प्रक्रिया प्रत्यक्षात कधी सुरु होणार असं विचारलं असता नार्वेकर यांनी 'लवकरच' असं उत्तर दिलं होतं.  


ठाकरे गटाची सर्वोच्च न्यायालयात धाव


ठाकरे गटाने (Thackeay Group) या आठवड्याच्या सुरुवातीला सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल करुन आमदारांच्या अपात्रतेच्या याचिकांवर जलद सुनावणी करण्यासाठी अध्यक्षांना निर्देश द्यावेत, अशी मागणी केली आहे. सर्वोच्च न्यायालयाने 11 मे रोजीच्या निकालात विधानसभा अध्यक्षांना याचिकांवर मुदतीत निर्णय घेण्याचे निर्देश दिले असतानाही राहुल नार्वेकर हे जाणूनबुजून सुनावणीला उशीर करत असल्याचा दावा केला, याचिकेत करण्यात आला होता.