Subhash Desai On Raj Thackeray : राज्यातील मशिदींवरील भोंगे उतरवले नाहीत तर मशिदींसमोर हनुमान चालिसाचे पठण केले जाईल अशी भूमिका मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी घेतली आहे. याबरोबरच भोंग्यांच्या मोठ्या आवाजामुळे त्रास होतो असे राज ठाकरे यांनी म्हटले आहे. हाच धागा पकडत उद्योगमंत्री सुभाष देसाई यांनी राज ठाकरे यांच्यावर निशाणा साधला आहे. दुपारपर्यंत झोपून राहतात आणि म्हणतात भोंग्याचा त्रास होतो, असा टोला सुभाष देसाई यांनी लगावला आहे.
सुभाष देसाई म्हणाले, "सभा सगळेच घेत असतात, परंतु आज होणारी सुपारी सभा आहे. असे सुपारीबाज नेते आले आणि झोपले. दुपारी उठायचं आणि सभा घ्यायची. दुपारपर्यंत झोपून राहतात आणि म्हणतात भोंग्याचा त्रास होतो. कमळाचं आणि भुंग्याचं नात जूनं आहे. मात्र, आता कमळाचं आणि भुंग्याचं हे नवीन नातं झालंय. हा भुंगा कमळाच्या पाकळ्या कुरतडेल."
"सरडा रंग बदलतो तो कमी पडेल, एवढे विचार बदलले आहेत. भगवी शाल घेऊन फोटो काढले म्हणून कोणाला शिवसेना प्रमुख होता येत नाही. त्यांच्या आवाजाची आणि शाल घेण्याची नक्कल करता येईल, पण त्यांच्या विचारांची नक्कल करता येणार नाही. सगळ्या शकुनांना ठेचून शिवसेना पुढे जाणार, असे सुभाष देसाई यांनी म्हटले आहे.
दरम्यान, पुढील काही दिवसांमध्ये मुख्यमंत्री उद्धव ठाकरे विरोधकांच्या टिकेला सभांमधून उत्तर देतील. मुख्यमंत्र्यांच्या या सभांबाबतची माहिती सुभाष देसाई यांनी यावेळी दिली. मुख्यमंत्री 14 तारखेला वांद्रे येथे सभा घेतील. त्यानंतर 8 जून रोजी औरंगाबादमध्ये मुख्यमंत्र्यांची सभा आहे. उद्धव ठाकरे या सभांमधून प्रत्येक टिकेला उत्तर देतील, असे देसाई म्हणाले.
महत्वाच्या बातम्या