मुंबई : देशासह राज्यात कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव पाहायला मिळत आहे. अशातच देशातील सर्वाधित कोरोना बाधित रुग्ण महाराष्ट्रात आहेत. त्यामुळे महाराष्ट्रातील सध्याची परिस्थिती चिंताजनक आहे. अशातच राज्यात एकीकडे कोरोनाचा प्रादुर्भाव, तर दुसरीकडे लॉकडाऊनमुळे लोकांमध्ये अनेक प्रश्न निर्माण झाले आहेत. राज्य सरकारमध्ये मात्र वेगळीच खलबतं चालली असल्याचे चित्र आहे. गेल्या तीन चार दिवसात राज्याच्या राजकारणात मोठ्या घडामोडी घडल्या आहेत. यादरम्यान ठाकरे सरकारच्या स्थिरतेबाबत चर्चांना उधाण आलं आहे. यासंदर्भात शिवसेना खासदार संजय राऊत यांनी पत्रकारांशी बातचित केली. त्यावेळी ते बोलताना म्हणाले की, 'महाराष्ट्राचं सरकार, ठाकरे सरकार... राष्ट्रवादी काँग्रेस, काँग्रेस आणि इतर प्रमुख पक्ष यांच्या महाविकास आघाडीचं बनलं आहे. हे सरकार संपूर्ण 5 वर्षांचा कालखंड पार पाडणार असून पुढिल निवडणुकाही आम्ही एकत्रच लढणार आहोत.' असं त्यांनी स्पष्ट केलं आहे.


काल (सोमवारी) शरद पवार यांनी राजभवनावर जाऊन भेट घेतली. त्यानंतर शरद पवार यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या निवास्थानी जाऊन त्यांची भेट घेतली. यासंदर्भात बोलताना संजय राऊत म्हणाले की, 'शरद पवार आणि मुख्यमंत्री यांच्यातील भेट गुप्त यासाठी होती, कारण त्याबाबत मीडियाला काहीही कल्पना नव्हती. एरव्ही होणाऱ्या बैठकांची कल्पना मीडियाला असते. त्यामुळे आम्हीही टेस्ट केस केली, पाहुयात मीडियाला समजतं का? आणि मातोश्रीवर शरद पवार आले, यामध्ये आश्चर्य वाटण्यासारखं काही नाही. शरद पवार मातोश्रीवर आले, मी स्वतः त्यांच्यासोबत होतो. सरकारच्या काही भविष्यांसंदर्भात, तसेच कोरोनाच्या पार्श्वभूमीवर काय उपाययोजना कराव्या लागतील. यासंदर्भात पवारांकडून मार्गदर्शन घेतलं, तर कोणाला वाईट वाटण्याचं कारण नाही. हिंदुस्थानचे पंतप्रधान नरेंद्र मोदीही पवारांचं मार्गदर्शन घेत असतात, हे आपल्या सर्वांना माहिती आहे. या देशातील अनेक मुख्य नेते, विविध राज्यांचे मुख्यमंत्रीही शरद पवारांशी चर्चा करत असतात. त्यामुळे जर त्यांनी महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांशी चर्चा केली. जे सरकार घडवण्यात त्यांचा सहभाग आहे, ते शिल्पकार आहेत. त्यामुळे यामध्ये गदारोळ माजण्यासारखं मला काही वाटत नाही.'


पाहा व्हिडीओ : महाविकासआघाडीचं सरकार पाच वर्ष पूर्ण करेल; पुढील निवडणुकाही आम्ही एकत्र लढणार : संजय राऊत



बैठकीमध्ये काँग्रेसचे नेते उपस्थित नव्हते, असं विचारल्यावर संजय राऊत म्हणाले की, 'याआधी झालेल्या इतर बैठकींना काँग्रेसचे नेते उपस्थित होते. शरद पवार हे ज्येष्ठ नेते असून मार्गदर्शक आहेत. त्यामुळे तातडीच्या गोष्टींमध्ये ते नेहमी उपस्थित असतात.' पुढे बोलताना राऊत म्हणाले की, 'पुढील पाच वर्ष सरकारला अजिबात धोका नाही. धोका असेल तर तो विरोधी पक्षाला आहे. राज्याला मजबूत विरोधी पक्षाची गरज आहे. आपल्या पक्षाची काळजी करावी. सरकार उत्तम आहे.'


विरोधाकांनी राज्यात राष्ट्रपती राजवट लागू करण्याची मागणी राज्यपालांकडे केली आहे. यासंदर्भात बोलताना संजय राऊत म्हणाले की, 'राष्ट्रपती राजवट लावायची असेल तर गुजरातमधून सुरुवात झाली पाहिजे. गुजरातमधील उच्च न्यायालयाने कोरोना हाताळण्यासंबंधी निष्कर्ष काढला आहे ते गंभीर आहे. सरकारी रुग्णालयं अंधारी कोठड्या झाल्या आहेत. रुग्णालयांची स्मशाने झाली आहेत असे ताशेरे न्यायालयाने ओढले आहेत. तेथील राज्यपांलनी मुख्यमंत्र्यांना बोलावून समज दिली पाहिजे आणि विरोधकांनीही मुख्यमंत्र्यांना जाब विचारला पाहिजे', असं संजय राऊत यांनी बोलताना सांगितलं आहे.