Sanjay Raut on Governor Bhagat Singh Koshyari : विधानसभा अध्यक्षपदाच्या निवडीवरून महाराष्ट्रात महाविकास आघाडी सरकार आणि राज्यपाल भगत सिंह कोश्यारी यांच्यात पुन्हा एकदा संघर्ष निर्माण होण्याची चिन्हे आहेत. शिवसेना नेते खासदार संजय राऊत यांनी राज्यपालांनी घेतलेल्या भूमिकेवरून त्यांना टोला लगावला आहे. महाराष्ट्राच्या राजभवनात अभ्यास आणि विद्ववतेचं अजीर्ण झालं असल्याचे त्यांनी म्हटले. विधीमंडळाचे हक्क, सरकारच्या शिफारसी, लोकभावना डावलण्यासाठी राज्यपालांची नियुक्ती झाली नाही असेही संजय राऊत यांनी म्हटले. 


शिवसेना नेते संजय राऊत यांनी पत्रकारांशी संवाद साधला. त्यावेळी विधानसभा अध्यक्षपदाच्या निवडीवर सुरू असलेल्या वादावर भाष्य केले. राऊत यांनी म्हटले की, राज्य सरकारने पाठवलेल्या पत्राला राज्यपालांनी काय उत्तर दिले, त्यावर बोलणार नाही. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी राज्यपालांना उत्तर पाठवले आहे. राज्यपालांनी इतका अभ्यास करू नये असे याआधीच म्हटले होते. घटनेनुसार काम करण्यासाठी राज्यपालांची नियुक्ती करण्यात आली आहे. विधानसभेचे हक्क,  सरकारच्या शिफारसी, लोकभावना डावलून काम करण्यासाठी राज्यपालांची नियुक्ती होत नाही, असेही राऊत यांनी म्हटले. 


राज्याचे राज्यपाल हे अभ्यासू आणि विद्ववान आहेत. पण त्याचे अजीर्ण होऊ नये असे वाटते. महाराष्ट्राच्या राजभवनात अधिक अभ्यासाचे अजीर्ण झाले आहे. अजीर्ण झाल्यानंतर पोटाचा त्रास सुरू होतो. असा त्रास कोणाला होत असल्यास त्यांच्यावर उपचार करण्यासाठी राज्याचे आरोग्य खातं सक्षम आहे, असेही संजय राऊत यांनी म्हटले. राज्यपाल घटनेच्याविरोधात वागत असतील अथवा तसे वागण्यासाठी कोणी दबाव टाकत असेल तर राज्य सरकारलादेखील राजकीय पावले उचलावी लागतील असे संजय राऊत यांनी म्हटले.


मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीबाबत काय म्हणाले संजय राऊत


शिवसेना नेते खासदार संजय राऊत यांनी महत्त्वाचे वक्तव्य केले आहे. विधानसभेचे अधिवेशन उत्तम प्रकारे सुरू झाले आहे. मुख्यमंत्री सरकारच्या कामकाजात सहभागी होत आहेत. संबंधित बैठकांनाही ते उपस्थित राहत आहेत. विधानसभेत येणार का, याबाबत थेट उत्तर देण्याचे टाळत राऊत यांनी 'वेट अॅण्ड वॉच' अशी प्रतिक्रिया दिली.