Maharashtra Vidhimandal Assembly Session : हिवाळी अधिवेशनाचा आज अखेरचा दिवस आहे. मात्र अद्याप मुख्यमंत्र्यांनी अधिवेशनात उपस्थिती दर्शवलेली नाही. आज शेवटच्या दिवशी मुख्यमंत्री हिवाळी अधिवेशनासाठी येणार का? याची उत्सुकता शिगेला पोहोचली आहे. दरम्यान मुख्यमंत्र्यांची प्रकृती व्यवस्थित असल्याची माहिती आदित्य ठाकरेंसह वेगवेगळ्या शिवसेना नेत्यांनी दिली आहे. 


आजचा अधिवेशनाचा दिवस विविध राजकीय घडामोडींनी गाजण्याची शक्यता आहे. विधिमंडळाच्या हिवाळी अधिवेशनाच्या शेवटच्या दिवशी विधानसभा अध्यक्षपद निवडणूक घेण्याचा महाविकास आघाडी सरकारचा निर्धार आहे. अध्यक्षपद निवडणुकीबाबत राज्यपालांना पाठवलेल्या पत्रासंदर्भात सकाळी 11 वाजेपर्यंत उत्तर न आल्यास निवडणूक घेण्यावर सरकार ठाम आहे. दुसरीकडे हिवाळी अधिवेशनाचा आज शेवटचा दिवस आहे. त्यामुळे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे उपस्थित राहणार का याकडं साऱ्यांचं लक्ष लागलं आहे. तिकडे कोकणात वातावरण तापलं आहे. शिवसैनिक संतोष परब हल्लाप्रकरणी भाजप आमदार नितेश राणेंना अटक होण्याची शक्यता आहे. 


मंजुरी द्या अन्यथा पाठिंबा गृहित धरु, विधानसभा अध्यक्षपदाच्या निवडीवर राज्यपालांना राज्यसरकारचं अल्टिमेटम


राज्यपालांनी उत्तर दिलं नाही तर सहमती आहे, असं समजून निवडणूक घेण्याची तयारी सत्ताधारी महाविकास आघाडीनं केली आहे. मात्र, तसं केल्यास पुढचे परिणाम काय होतील याचीही चाचपणी सत्ताधारी करत असल्याचं कळतं. त्यामुळे आज अधिवेशनाच्या अखेरच्या दिवशी विधानसभा अध्यक्ष निवडीवरून काय घडामोडी घडत आहेत याची उत्सुकता आहे. तर दुसरीकडे विधानसभा अध्यक्षपदाच्या निवडणुकीत आम्हालाही मतदानाचा अधिकार द्या, अशी मागणी 12 निलंबित भाजप आमदारांनी राज्यपालांकडे केली आहे. आमचा मतदानाचा हक्का हिरावला जातोय. मतदान करणं संवैधानिक अधिकार आहे. त्यामुळे मतदानाचा अधिकार अबाधित ठेवावा, अशी विनंती राज्यपालांकडे केली आहे.


पाहा व्हिडीओ : विधानसभा अध्यक्ष निवडणुकीवरून राज्यपाल-राज्य सरकार संघर्ष कोणतं वळण घेणार?



मुख्यमंत्री उपस्थित राहणार? 


हिवाळी अधिवेशनाचा आज अखेरचा दिवस आहे. मात्र अद्याप मुख्यमंत्र्यांनी अधिवेशनात उपस्थिती दर्शवलेली नाही. आज शेवटच्या दिवशी मुख्यमंत्री हिवाळी अधिवेशनासाठी येणार का? याची उत्सुकता शिगेला पोहोचली आहे. दरम्यान मुख्यमंत्र्यांची प्रकृती व्यवस्थित असल्याची माहिती आदित्य ठाकरेंसह वेगवेगळ्या शिवसेना नेत्यांनी दिली आहे. 


अटकपूर्व जामीनासाठी नितेश राणेंची न्यायालयात धाव; आज सुनावणी


संतोष परब हल्लाप्रकरणात नितेश राणेंवर अटकेची टांगती तलवार कायम आहे. त्यामुळे अटक टाळण्यासाठी नितेश राणे यांनी कोर्टात धाव घेतली आहे. भाजप आमदार नितेश राणे (Nitesh Rane) यांच्या अटकपूर्व जामीन प्रकरणात आज सिंधुदुर्ग जिल्हा सत्र न्यायालयात सुनावणी पार पडणार आहे. आज त्यांच्या अटकपूर्व जामीन अर्जावर सुनावणी होणार आहे. यासाठी दोन्ही बाजूंनी वकिलांची फौज उभी करण्यात आली आहे. नितेश राणे यांच्यातर्फे बाजू मांडताना अॅड. संग्राम देसाई हे युक्तिवाद करतील. तर अॅड राजेंद्र रावराणे, राजेश परुळेकर, उमेश सावंत ही कायदेतज्ञ टीम सहकार्याला असेल. विशेष सरकारी वकील म्हणून अॅड प्रदीप घरत आणि अॅड भूषण साळवी हे राज्य सरकारतर्फे ते युक्तिवाद करतील. आज दुपारी 2.45 वाजता जिल्हा सत्र न्यायालयात सुनावणी सुरु होईल. दरम्यान केंद्रीय मंत्री नारायण राणे (Narayan Rane) आपला नागपूर दौरा अर्धवट सोडून कणकवलीला परतल्यानं चर्चांना आणखी उधाण आलं आहे. 


दिवसभरातील महत्त्वाच्या बातम्यांचा आढावा घेण्यासाठी एबीपी माझा लाईव्ह पाहा