Nitesh Rane : विधानसभेच्या पायऱ्यावर बसून म्याव म्याव करत मांजराची नक्कल करत चिडवत होते ते आज लपून बसलेत असल्याची टीका शिवसेना नेते दीपक केसरकर यांनी नितेश राणे यांच्यावर केली आहे. संतोष परब हल्लाप्रकरणात नितेश राणेंवर अटकेची टांगती तलवार आहे. सोमवारपासून नितेश राणे अज्ञातवासात आहेत. त्यावरून दीपक केसरकर यांनी नितेश राणे यांच्यावर टीका केली. 


माजी गृहराज्यमंत्री दीपक केसरकर यांनी म्हटले की, विधानसभेच्या पायऱ्यावर बसून म्याव म्याव करत मांजराची नक्कल करत चिडवत होते ते आज लपून बसलेत. वाघाला घाबरून की कोर्टाला घाबरून लपून बसले माहिती नाही. परंतु गुन्हेगारी प्रवृत्तीची लोक पोलिसांना बघून घाबरतात ही वस्तुस्थिती असल्याचे दीपक केसरकर यांनी म्हटले. कोणी गुन्हा केला माहिती नाही पण जे लपून बसले आहेत ते कायद्यापासून आणि पोलिसांपासून लपून बसलेत असल्याचे त्यांनी म्हटले.


दीपक केसरकर यांनी या वेळी केंद्रीय मंत्री नारायण राणे यांच्यावर टीका केली. चुकीचं वागत असाल तर कायदा सर्वांसाठी समान आहे. केंद्रीय मंत्री आहात म्हणून मुलाला वाचवणार अशी भूमिका घेत असतील तर उत्तर प्रदेश मधील मंत्र्याच्या पुत्राला वाचवताना काय झालं ते पाहावं, असेही त्यांनी नारायण राणे यांना म्हटले. 


नितेश राणे हे सरकारी अधिकाऱ्यांवर हल्ले करून 5 दिवस पोलीस कोठडीत कस्टडीत राहिले हे विसरलेत. त्यांना त्यावेळी मिळालेला जामीन हा सशर्त जामीन मिळाला होता अशी आठवणही केसरकर यांनी करून दिली. न्यायालय जामीन देताना खंडणी, हल्ले करण्यासारखे गुन्हे ज्यांच्यावर दाखल आहे. त्यांना जामीन देताना विचार करेल अशी अपेक्षाही केसरकर यांनी व्यक्त केली. 


अटकपूर्व जामीनासाठी नितेश राणे यांची कोर्टात धाव 


संतोष परब हल्लाप्रकरणात नितेश राणेंवर अटकेची टांगती तलवार कायम आहे. त्यामुळे अटक टाळण्यासाठी नितेश राणे यांनी कोर्टात धाव घेतली आहे. भाजप आमदार नितेश राणे (Nitesh Rane) यांच्या अटकपूर्व जामीन प्रकरणात आज सिंधुदुर्ग जिल्हा सत्र न्यायालयात सुनावणी पार पडणार आहे. आज त्यांच्या अटकपूर्व जामीन अर्जावर सुनावणी होणार आहे. 


काय आहे प्रकरण? 


18 डिसेंबरला संतोष परब यांच्यावर कणकवलीत हल्ला झाला होता. परब हे जिल्हा बँक अध्यक्ष सतीश सावंत यांचे निकटवर्तीय असून करंजे गावचे माजी सरपंच आहेत. त्यांच्यावर इनोव्हा कारमधून आलेल्या दोघांनी धारदार चाकूने वार केले होते. या हल्ल्यात परब जखमी झाले होते. या प्रकरणाला सिंधुदुर्ग जिल्ह्यातील राजकिय शत्रुत्वाची पार्श्वभूमी असल्याच्या संशयावरून पोलिसांनी भाजपच्या गोटात चौकशीची सूत्रे हलवली आहेत. मुख्य संशयित आरोपी सचिन सातपुतेला सिंधुदुर्ग ग्रामीण पोलिसांनी दिल्लीतून अटक करण्यात यश मिळवले आहे. सातपुते हा भाजप आमदार नितेश राणे यांच्या स्वाभिमानी संघटनेचा कार्यकर्ता आहे. त्यामुळे या प्रकरणात नितेश राणेंची चौकशी सुरू करण्यात आली आहे.