Maharashtra Politics : अमित शहा अमित शहा (Amit Shah) आणि देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांच्या सांगण्यावरून आम्ही दोन ते तीन वेळेस माघार घेतलीय, तरी राज्यपाल पद आनंदराव आडसूळ (Anandrao Adsul) यांना का नाही? अमित शहा यांनी आनंदराव अडसूळ यांना राज्यपाल करणार, असा शब्द मार्च महिन्यात दिला होता. मग या यादीमध्ये आनंदराव अडसूळ यांचे नाव का नाही? असा सवाल उपस्थित करत महायुतीत भाजपकडून आमच्यावर अन्याय झाला असल्याची खंत कॅप्टन अभिजीत अडसूळ (Captain Abhijeet Adsul) यांनी बोलताना व्यक्त केली आहे.
भाजपकडून प्रत्येक वेळी आमच्या शब्दाला केराची टोपली- अभिजीत अडसूळ
नुकतेच सीपी राधाकृष्णन यांची महाराष्ट्राचे नवीन राज्यपाल (Maharashtra New Governor CP Radhakrishnan) म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. रमेश बैस यांच्याजागी राधाकृष्णन यांची नियुक्ती करण्यात आली आहे. याआधी ते झारखंडचे (Jharkhand) राज्यपाल होते. दरम्यान, राज्यात विधानसभा निवडणुकांची (Vidhansabha Election) तयारी सुरु आहे. अशातच राधाकृष्णन यांची राज्यपाल म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. दरम्यान, या नियुक्तीवरुन आता महायुतीमध्ये नाराजी नाट्य सुरू झाले आहे. एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांच्या शिवसेनेतील (Shivsena) नेते आणि माजी खासदार आनंदराव अडसूळ यांना राज्यपाल पद का दिले नाही, असा प्रश्न उपस्थित करत कॅप्टन अभिजीत अडसूळ यांनी आपली नाराजी उघडपणे बोलून दाखवली आहे.
प्रत्येक वेळी आम्ही बलिदान द्यायचं का?
मुख्यमंत्र्यांनी दोन वेळेस रेकमेंडेशन लेटर अमित शहा यांना पाठवलं होतं. मग दिलेला शब्द का पाळला गेला नाही? असा जर अन्याय आमच्यावर भाजपकडून होत असेल तर आम्हाला घरी बसल्याशिवाय पर्याय नसल्याचेही कॅप्टन अभिजीत अडसूळ म्हणाले. मुंबई बँकेचे अध्यक्षपद प्रवीण दरेकर यांना मी माघार घेतल्यामुळे मिळालं. देवेंद्र फडणवीस यांनी मला माघार घ्यायला सांगितले होते, त्यानुसार मी त्यांचा ऐकलं आणि माघार घेतली. असे असताना प्रत्येक वेळी आमच्या शब्दाला केराची टोपली भाजपकडून दाखवली जात आहे. प्रवीण दरेकर हे देवेंद्र फडणवीसच्या खाली काम करतात. तरी त्यांचं सुद्धा ऐकले जात नाही. परिणामी, प्रत्येक वेळी आम्ही बलिदान द्यायचं का? त्यापेक्षा आम्ही घरी बसलेले बरं असल्याची नाराजी कॅप्टन अभिजीत अडसूळ यांनी बोलून दाखवली आहे.
माझ्यासारख्या कार्यकर्त्यावर अन्याय - अभिजीत अडसूळ
एकनाथ शिंदे यांनी जे भरभरून प्रेम दिले त्यांच्यामुळे आज प्रत्यक्ष शिवसैनिक त्यांच्यासोबत टिकून आहे. भाजप आणि सेना युती म्हणून आम्ही प्रत्येक वेळी हे सहन करायचं का? देवेंद्र फडणवीस एवढे जर प्रेम आमच्यावर करतात तर आम्हाला प्रत्येक वेळेस मागे का ठेवतात? या सर्व प्रकारामुळे माझ्यासारख्या कार्यकर्त्याला अन्याय झाल्यासारखं वाटत असल्याची भावना कॅप्टन अभिजीत अडसूळ यांनी बोलताना व्यक्त केली आहे.
हे हे वाचा