मुंबई : "स्वातंत्र्य अबाधीत ठेवण्यासाठी जे प्रयत्न करतील त्यांच्यासोबत आम्ही जायला तयार आहोत. केंद्राच्या गुलामीत राज्य नाही. राज्य आणि केंद्राला समान अधिकार आहेत. सगळं मलाच पाहिजे या हव्यासापोटी सत्ता काबीज केली जात आहे. राज्यघटना पायदळी तुडवून सत्ता पाहजे यांना पहिलं खाली खेचले पाहिजे. याबरोबरच सत्ता पिपासू लोकांना सत्तेतून खाली खेचा, असं आवाहन माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांनी केलं आहे.
प्रबोधनकार डॉट कॉम या संकेतस्थळाचा आज दादरमधील शिवाजी मंदिरात लोकार्पण सोहळा पार पडला. यावेळी उद्धव ठाकरे बोलत होते. या कार्यक्रमाला वंचित बहुजन आघाडीचे प्रमुख प्रकाश आबंडेकर, शिवसेना नेते सुभाष देसाई, प्रबोधनकार डॉट कॉम या संकेतस्थळाचे संपादक सचिन परब यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते. यावेळी उद्धव ठाकरे यांनी देशातील सद्य परिस्थितीवरून केंद्र सरकारवर जोरदार हल्लाबोल केला.
उद्धव ठाकरे म्हणाले, "सध्याची परिस्थिती पाहिली तर आपल्या देशाची वाटचाल हुकुमशहाच्या दिशेने चालली आहे. इंग्रजांची निती होती तशी आज परिस्थिती निर्माण झाली आहे. जाती- धर्माच्या भिंती उभा करण्याचं काम सध्या सुरू आहे. वाटेल त्या मार्गाने सत्ता मिळवण्याचं काम सध्या सुरू आहे. त्यामुळे या सत्ताधाऱ्यांना खाली खेचलं पाहिजे. लोकशाही पायदळी तुडवून सत्ता मिळवणाऱ्यांना खाली खेचा."
"न्याय व्यवस्थेवर आता प्रश्न चिन्ह निर्माण केले जात आहेत. न्यायमुर्ती म्हणून सध्या जे बसले आहेत ते कसे आले आहेत? कायदा मंत्री ज्या प्रकारे बोलतात ते त्यांचं वैयक्तीक मत आहे का? ते स्पष्ट केलं पाहिजे. त्यांचा स्वभाव आहे की पिल्लू सोडायचं, ते मोठ झालं की मग पालकत्व स्वीकाराच, असा टोला यावेळी उद्धव ठाकरे यांनी लगावला.
प्रकाश आंबेडकरांना साद
उद्धव ठाकरे यांनी यावेळी प्रकाश आंबेडकर यांना एकत्र येण्याची साद घातली. "प्रकाशजी आता आपण एकत्र आलो आहोत, ते काम आपल्याला करावाच लागेल. आतापर्यंत बाबासाहेब आणि बाळासाहेब यांचे फोटोंना अभिवादन करायचे. आता दोन नातू एकत्र आले आहे. कुटूंब एकत्र आले आहेत. आपल्या दोघांचेही वैचारिक व्यासपीठ एकच आहे. दोन्ही विचारांचे वारसे घेऊन आपण पुढे चाललो आहोत. परंतु, जर आपण एकत्र आलो नाही तर आपल्याला आजोबांचं नाव घेण्याचा अधिकार नाही, असे म्हणत उद्धव ठाकरे यांनी प्रकाश आंबेडकर यांना एकत्र येण्यासाठी साद घातली आहे.
महत्वाच्या बातम्या
वैदिक धर्म म्हणजे विधवेचं मुंडण करणारा, संत परंपरा म्हणजे तिचा पुनर्विवाह, योग्य ते निवडण्याची वेळ: प्रकाश आंबेडकर