मुंबई : राज्यात गेल्या 19 दिवसांपासून सुरु असलेला सत्तासंघर्ष अखेरच्या टप्प्यावर आहे. आता 'महाशिवआघाडी'चं सरकार होणार हे निश्चित झालं असून कॉंग्रेस आणि राष्ट्रवादीने शिवसेनेला सत्तास्थापनेसाठी पाठिंब्याचे पत्र दिले असल्याची माहिती आहे. सत्तास्थापनेचा दावा करण्यासाठी शिवसेना नेते आदित्य ठाकरे, एकनाथ शिंदे यांच्यासह शिवसेनेचे अन्य नेते आणि काही अपक्ष आमदार राजभवनावर पोहोचले आहेत.


शिवसेनेने सत्तेचा दावा केल्यानंतर शिवसेनेचा मुख्यमंत्री कोण असणार ही चर्चा सुरु झाली आहे. शिवसेनेकडून मुख्यमंत्रीपदासाठी शिवसेना पक्ष प्रमुख उद्धव ठाकरे यांच्यासह शिवसेना नेते एकनाथ शिंदे आणि आदित्य ठाकरे यांचं नाव चर्चेत आहे. यामध्ये एकनाथ शिंदे यांचे नाव जास्त आघाडीवर आहे. वीस वर्षानंतर राज्यात शिवसेनेचा मुख्यमंत्री राज्याच्या मुख्य पदावर विराजमान होणार आहे. त्यामुळे मुख्यमंत्रीपदाची माळ कुणाच्या गळ्यात पडणार याकडे सर्वांचे लक्ष आहे.

दरम्यान शिवसेनेचा मुख्यमंत्री 17 नोव्हेंबर रोजी शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या पुण्यतिथीच्या दिवशी शपथ घेणार असल्याची देखील माहिती आहे. 17 नोव्हेंबर रोजीच शिवसेनेच्या मुख्यमंत्र्याने शपथ घ्यावी अशी इच्छा शिवसेना आमदारांनी देखील व्यक्त केली आहे.



शिवसेनेला काँग्रेस आणि राष्ट्रवादीने पाठिंबा दिल्याने राज्यात महाशिवआघाडीचं सरकार येणार हे जवळपास निश्चित झालं आहे. सोनिय गांधी यांचा फोन आल्यावर पाठिंब्याचे पत्र फॅक्सने राजभवनात पाठवण्यात आलं आहे. शिवसेना नेते एकनाथ शिंदे आणि आदित्य ठाकरे राज्यपालांकडे पोहोचले आहेत. त्यामुळे राज्यात शिवसेनेचा मुख्यमंत्री होणार हे आता स्पष्ट झालं आहे.


शिवसेनेला समर्थनाचं पत्र राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेसने राज्यपालांना पाठवलं आहे. राज्यपालांनी सत्तास्थापनेचा दावा करण्यासाठी शिवसेनाला संध्याकाळी 7.30 वाजेपर्यंतची वेळ दिली आहे. मात्र डेडलाईन संपण्यासाठी आधी शिवसेना सत्ता स्थापन करण्याच यशस्वी झाल्याचं स्पष्ट झाले आहे.

शिवसेनेचे 56 आमदार आहेत, तर त्यांच्याकडे 8 अपक्ष आणि इतर पक्षांच्या आमदारांचा पाठिंबा आहे. असे मिळून शिवसेनेकडे 64 आमदारांचे संख्याबळ आहे. राष्ट्रवादीकडे 54 तर काँग्रेसकडे 44 आमदारांचे संख्याबळ आहे. तिन्ही पक्षांकडे मिळून 162 आमदारांचे संख्याबळ आहे. राज्यात सत्तास्थापन करण्यासाठी 144 आमदारांची आवश्यकता आहे.