मुंबई : भाजपने विरोधीपक्षात राहण्याचा निर्णय घेतला आहे. भाजप सत्तास्थापन करणार नाही, मात्र तरी मित्रपक्षांनी भाजपसोबत राहण्याचा निर्णय घेतला आहे. शिवसेनेने काँग्रेस-राष्ट्रवादीसोबत परस्पर विरोधी विचारांची युती करुन अल्पकाळ टिकणारं सरकार स्थापन करण्यापेक्षा भाजपसोबत सरकार स्थापन करावं, असं आवाहन रिपाइंचे अध्यक्ष आणि केंद्रीय मंत्री रामदास आठवले यांनी केलं आहे. सर्वच मित्रपक्ष शिवसेनेची मनधरणी करताना दिसत आहेत.  मात्र सध्याची राजकीय स्थिती पाहता त्यांचे प्रयत्न यशस्वी होतील, याची शक्यता फारच कमी आहे.


भाजपने साडेतीन वर्ष मुख्यमंत्रीपद आणि शिवसेनेने साडेतीन वर्षे उपमुख्यमंत्री पद घ्यावं. तर त्यांनतरची दीड वर्षे शिवसेनेने मुख्यमंत्री पद घ्यावं आणि भाजपने दीड वर्षे उपमुख्यमंत्री पद घेऊन, आपसातील वाद मिटवावा, असा सल्ला रामदास आठवलेंनी दिला.


VIDEO | महाशिवआघाडीचंच सरकार येणार, काँग्रेस शिवसेनेला पाठिंबा देणार, सूत्रांची माहिती



मित्रपक्षांची उद्धव ठाकरेंना विनंती आहे की जनतेचा कौल महायुतीला आहे, महायुतीचंच सरकार यावं. आपल्या घरातलं काय करायचंय ते आपण बघुन घेऊ, दुसरीकडे जाण्याची गरज नाही. संजय राऊतांबद्दल आम्ही काही बोलत नाही, आम्ही उद्धव ठाकरेंशी बोलतो, असं महादेव जानकारांनी म्हटलं आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसच व्हावेत हीच आमची इच्छा आहे. दुसऱ्यांच्या नादाला लागण्यापेक्षा आपल्या घरात काय करायचं, आपण बघुन घेऊ. येत्या दोन-तीन दिवसात सत्ता स्थापनेचा तिढा सुटेल अशी आशा आहे, असं महादेव जानकरांनी सांगितलं.


आम्ही विरोधात असलो तरी भाजप सोबतच असणार आहोत, असं सदाभाऊ खोत यांनी म्हटलं आहे. भाजपने आम्हाला पदं दिली, आम्हाला योग्य मान-सन्मान दिला आहे. छोट्या पक्षाचे राजकीय अस्तित्व संपलं, हे म्हणणं चुकीचं आहे. आम्ही आमदार म्हणून काम करतचं राहणार आहोत, असंही सदाभाऊ खोत यांनी सांगितलं.


भाजपचे मित्रपक्ष असलेल्या रामदास आठवलेंचा रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया, महादेव जानकरांचा राष्ट्रीय समाज पक्ष, विनायक मेटेंचा शिवसंग्राम, सदाभाऊ खोत यांचा रयत क्रांती आणि इतर पक्षांच्या सर्व उमेदवारांनी भाजपच्याच चिन्हावर विधानसभेची निवडणूक लढवली होती.


एबीपी माझा लाईव्ह स्ट्रीमिंग