मुंबई/वाशिम: दसऱ्यापूर्वी शेतकरी कर्जमाफीची अंमलबजावणी करा, अशी मागणी करत शिवसेनेने राज्यभर मोर्चांचं आयोजन केलं. त्या त्या जिल्ह्यातील शिवसेना नेत्यांच्या नेतृत्त्वात हे मोर्चे काढण्यात आले.

वाशिममध्ये शिवसेनेत फाटाफूट

शिवसेनेने राज्यभरात कर्जमुक्ती मोर्चाचे आयोजन केलं आहे. त्यानुसार विविध जिल्ह्यात मोर्चे काढण्यात येत आहेत. मात्र मागणी एक आणि मोर्चे दोन हे चित्र वाशिममध्ये पाहायला मिळालं. वाशिममध्ये शिवसेनेच्या खासदार भावना गवळी यांच्या नेतृत्वात शिवाजी चौक ते जिल्हाधिकारी कार्यालयापर्यंत मोर्चा काढण्यात आला.

मात्र, त्याच मोर्चाच्या अगदी काही अंतरावर शिवसेनेच्या कार्यकर्त्यांचा दुसरा मोर्चा निघाल्याने सेनेतील गटबाजी आता किती चव्हाट्यावर आली आहे हे यावरून दिसून येतं.

शेतकऱ्यांना दसऱ्यापूर्वी कर्जमुक्त करावं, मूग, उडीद, सोयाबीन ही पिके अल्प पावसामुळे नष्ट झाली असून, या पिकाची नुकसान भरपाई देण्यात यावी, पीकविमा आणि कर्जमुक्ती अर्जाची तारीख वाढवून देण्यात यावी, अशा विविध मागण्या यावेळी शिवसेनेने जिल्हाधिकाऱ्यांकडे केली.

 चंद्रपुरात धरणे आंदोलन

सरकारने घोषित केलेली कर्जमाफी ही नवरात्रीच्यापूर्वी देण्यात यावी, या मागणीसाठी आज चंद्रपुरात शिवसेनेच्यावतीने धरणे आंदोलन करण्यात आले. चंद्रपूर जिल्हाधिकारी कार्यालयासमोर शिवसेना आमदार बाळू धानोरकर यांच्या नेतृत्वात हे धरणे आंदोलन करण्यात आले.

सरकारने कर्जमाफीची केवळ घोषणा केली, मात्र अजून शेतकऱ्यांना त्याचा फायदा मिळालेला नाही. चंद्रपूर जिल्ह्यातील 1 लाख 90 हजार शेतकरी या कर्जमाफीसाठी पात्र असूनही अजून हजारो शेतकऱ्यांचे कर्जमाफीचे फॉर्म भरुन झालेले नाहीत. त्यामुळे ही कर्जमाफी अजून किती काळ लांबणार, असा सवाल करत दसऱ्यापूर्वी कर्जमाफी द्यावीर अशी मागणी शिवसेनेने सरकारकडे केली आहे.

सोलापूर

सोलापुरात शिवसैनिकांनी जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढला. कर्जमाफीची अमंलबजावणी तातडीने करण्याची मागणी शिवसैनिकांनी केली. दसऱ्यापूर्वी कर्जमाफी देण्याच्या मागणीसाठी शिवसैनिक आग्रही आहेत. कर्जमाफीच्या नावावर महाराष्ट्रातल्या शेतकऱ्यांची थट्टा केली जात असल्याचा  आरोप शिवसैनिकांनी केला.

औरंगाबाद

"कर्जमाफीच्या घोषणेला तीन महिने झाले, तरीही अटी आणि शर्थीतच कर्जमाफी अडकली आहे. दसऱ्यापूर्वी कर्जमाफीची पूर्तता करा. अशी मागणी शिवसेनेने केली.  शिवसेनेच्यावतीने औरंगाबादच्या विभागीय आयुक्त् कार्यालयावर मोर्चा काढण्यात आला. या मोर्चामध्ये जिल्हाभरातून शिवसेनेचे कार्यकर्ते,नेते आणि शेतकरी सहभागी झाले होते. औरंगाबाद शहरातील महात्मा फुले यांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करून मोर्चाला सुरुवात झाली. कर्जमाफीसाठी शेतकऱ्यांकडून अर्ज भरुन घेताना अडचणी आल्या, तरीही या अडचणीत शेतकऱ्यांनी मोठ्या आशेने फॉर्म भरले. आता सरकारकडून तारखांवर तारखा दिल्या जात असल्याने,  कर्जमाफी कधी मिळणार हा प्रश्न शेतकऱ्यांना पडला आहे. म्हणून दसऱ्यापूर्वी ही कर्जमाफी सरकारने करावी अशी मागणी शिवसेना उपनेते खासदार चंद्रकांत खैरे यांनी केली.