नागपूर : बहुचर्चित कुश कटारिया हत्येचा दोषी आयुष पुगलियाची नागपूर मध्यवर्ती कारागृहातच हत्या करण्यात आली. कैद्यांच्या आपापसांतील भांडणानंतर त्याची हत्या झाली.

मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने अपहरण आणि हत्याचा दोषी आयुष पुगलियाला तिहेरी जन्मठेपेची शिक्षा सुनावली होती. नागपूर मध्यवर्ती कारागृहात तो शिक्षा भोगत होता.

आज सकाळी साडे सातच्या सुमारास नागपूर कारागृह परिसरात सहकारी कैद्यांनी त्याची हत्या केली. कैद्यांनी अवजड टाईलने त्याच्या डोक्यात प्रहार केला आणि रक्ताच्या थारोळ्यात सोडून निघून गेले. त्यानंतर आयुष पुगलियाचा जागीच मृत्यू झाला.

यानंतर जेल प्रशासनाने धंतोली पोलिस स्टेशनला याबाबतची माहिती दिली. कैद्याची ओळख अद्याप पटलेली नाही. परंतु हत्येचं कारण अद्याप स्पष्ट झालेलं नाही.

पोलिसांनी आयुष पुगलियाचा मृतदेह पोस्टमॉर्टेमसाठी पाठवलं आहे. अहवालानंतरच त्याच्या हत्येचं कारण स्पष्ट होईल, असं पोलिसांनी सांगितलं.

काय आहे प्रकरण?


उद्योजक ‘सुरुची मसालेवाले’ यांचा मुलगा कुश कटारिया, या 8 वर्षाच्या चिमुकल्याचं, 11 ऑक्टोबर 2011 रोजी, राहत्या घरातून अपहरण करण्यात आलं होतं. चार दिवसांनी त्याचा मृतदेह आढळला होता. कटारिया कुटुंबाला ओळखणाऱ्या आयुषनेच चॉकलेटचं आमिष दाखवून कुशचं अपहरण केलं होतं.

पोलिसांनी या प्रकरणाचा तपास सुरु केल्यानंतर त्याच्याच इमारतीत राहणाऱ्या आयुष पुगलियाला अटक केली. आयुषपाठोपाठ त्याचे भाऊ नितीन आणि नवीनलाही अटक करण्यात आली होती. तिघांच्या अटकेनंतर चार दिवसांनी कळमना भागातल्या एका बांधकाम सुरु असेलल्या इमारतीत कुश कटारियाचा मृतदेह सापडला.

अपहरण आणि हत्येनंतर जनप्रक्षोभाच्या पार्श्वभूमीवर या हत्याकांडाच्या खटल्यासाठी विशेष सरकारी वकील उज्ज्वल निकम यांची नियुक्ती करण्यात आली होती. या हत्येप्रकरणी 59 जणांच्या साक्षी घेण्यात आल्या होत्या. खंडणीसाठी अपहरण आणि हत्या केल्याचं सिद्ध करण्यासाठी 8 वर्षांच्या कुशच्या दोन मित्रांची साक्ष महत्त्वाची ठरली. या लहान मुलांनी न घाबरता न्यायालयात साक्षीदार म्हणून माहिती दिली.

4 एप्रिल 2013 ला नागपूरच्या जिल्हा आणि सत्र न्यायालयाने आरोपी आयुषला दोषी मानत दुहेरी जन्मठेप सुनावली होती.
मात्र दोन कोटीच्या खंडणीसाठी कुशचं अपहरण केल्याच्या आरोपातून आयुषची निर्दोष मुक्तता केली होती.

कुश कटारियाच्या कुटुंबियांनी न्यायालयाच्या निर्णयाला उच्च न्यायालयात आव्हान देत फाशीची मागणी केली. त्यानंतर 22 जून 2015 रोजी मुंबई उच्च न्यायालयाने नागपूर खंडपीठाने आयुषच्या आधीच्या दोन्ही जन्मठेप कायम ठेवत, त्याने दोन कोटींच्या खंडणीसाठी कुशचं अपहरण केल्याचं मान्य केले आणि त्याला तिसरी जन्मठेप सुनावली.

संबंधित बातम्या

कुश कटारिया हत्येप्रकरणी आरोपीला जन्मठेप


कुश कटारियाचा मारेकरी आयुषला तिहेरी जन्मठेप