मुंबई: नॅशनल हेराल्डप्रकरणी ईडीने सोनिया गांधींची चौकशी सुरू केल्यानंतर काँग्रेसच्या वतीनं राज्यभर आंदोलन करण्यात आलं. आज सकाळी मुंबईच्या ईडी कार्यालयावर काँग्रेसच्या वतीने मोर्चा काढण्यात आला. मुंबईसोबतच पुणे, अमरावती आणि राज्यभर काँग्रेसकडून ईडीचा निषेध करण्यात आला.


मोदी सरकारचं सुडाचं राजकारण; भाई जगताप यांचा आरोप
सोनिया गांधींची ईडी चौकशी म्हणजे मोदी सरकारचं सूडाचं राजकारण असल्याची टीका मुंबई काँग्रेसचे अध्यक्ष आणि आमदार भाई जगताप यांनी केला आहे. यावेळी काँग्रेसच्या वतीने सोनिया गांधी यांच्या समर्थनार्थ आणि केंद्र सरकारच्या विरोधात जोरदाग घोषणाबाजी करण्यात आली. पोलिसांनी भाई जगताप यांच्यासह काही कार्यकर्त्यांना अटक केली, नंतर त्यांना सोडून देण्यात आलं. 


पुण्यात काँग्रेसचं जिल्हाधिकारी कार्यालयाबाहेर आंदोलन 
सोनिया गांधी यांच्या ईडीच्या चौकशीचा निषेध करण्यासाठी पुण्यातील जिल्हाधिकारी कार्यालयासमोर काँग्रेसच्या वतीनं आंदोलन करण्यात आलं. यावेळी केंद्रातील मोदी सरकारच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी करण्यात आली. सरकार केंद्रीय यंत्रणाचा गैरवापर करत असल्याचा आरोप यावेळी काँग्रेसकडून करण्यात आला. या आंदोलनामध्ये माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण, माजी मंत्री सतेज पाटील, आमदार प्रणिती शिंदे यांनी सहभाग घेतला. 


अमरावतीत काँग्रेसचा मोर्चा
सोनिया गांधी यांच्या समर्थनार्थ अमरावतीमध्ये काँग्रेस कार्यकर्ते रस्त्यावर आले होते. अमरावती काँग्रेसचे वतीने आणि माजी मंत्री यशोमती ठाकूर यांच्या नेतृत्वात अमरावती विभागीय कार्यालयावर मोर्चा काढण्यात आला. केंद्र सरकार ईडीच्या माध्यमातून दडपशाही करत असल्याचा आरोप यावेळी करण्यात आला. अमरावतीच्या इर्विन चौकात काँग्रेसने केंद्र सरकार विरोधात जोरदार अशा घोषणाबाजी केली. मोदी सरकारच्या दडपशाही विरोधात हा मोर्चा असून आम्ही केंद्र सरकारचा निषेध करतोय अशी प्रतिक्रिया आमदार यशोमती ठाकूर यांनी दिली.


सोनिया गांधी संविधानापेक्षा मोठ्या नाहीत: सुधीर मुनगंटीवार
सोनिया गांधी यांना संविधानापेक्षा मोठा दर्जा नाही आणि त्यामुळे त्यांना चौकशी साठी बोलावलं म्हणून आंदोलन करण्याची गरज नाही असं म्हणत भाजप नेते सुधीर मुनगंटीवार यांनी काँग्रेसच्या आंदोलनावर टीका केली आहे. आज देशभर ED कार्यालयावर काँग्रेस कार्यकर्ते आंदोलन करत आहेत. त्या पार्श्वभूमीवर मुनगंटीवार यांनी ही टीका केली आहे. त्यांच्या मते नरेंद्र मोदी यांची नऊ-नऊ तास चौकशी झाली, पण भाजपने कधी आंदोलन केले नाही. आम्हाला देशाच्या संविधानावर आणि न्यायव्यवस्थेवर पूर्ण विश्वास आहे. पण कोर्टाचा एक निर्णय विरोधात गेला म्हणून आणीबाणी लावणारं काँग्रेस लोकशाहीच्या गोष्टी करतय असं म्हणत मुनगंटीवार यांनी या आंदोलनावर टीकास्त्र डागलंय.


नॅशनल हेराल्डप्रकरणी  सुरू असलेली  काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी चौकशी संपली. सोनिया गांधी यांची चौकशी तब्बल तीन तास सुरू होती.  सोमवारी सोनिया गांधी यांना पुन्हा  चौकशीला  बोलावण्याची शक्यता आहे. सोनिया गांधी यांच्या चौकशीनंतर काँग्रेस नेते जयराम रमेश म्हणाले, "काँग्रेस अध्यक्ष सोनिया गांधी चौकशीसाठी ईडीसमोर उपस्थित होत्या. तुम्हाला जे विचारायचे आहे ते तुम्ही विचारू शकता मी 8 वाजेपर्यंत बसण्यास तयार आहे. तसेच मी उद्या देखील येण्यास तयार आहे, असे सोनिया गांधी म्हणाल्या. परंतु इडीकडे कोणतेही प्रश्न नव्हते."